मुंबई : ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आलीय. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. या यादीनंतर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेतकरी बांधवांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना आज आपल्या डोक्यावरचं ओझं कमी झालं असं वाटतंय. तर, आपलं नाव पहिल्या यादीत नसलेल्या शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केलीय. दुष्काळ, गारपीट या संकटामुळे कर्जाचा डोंगर असलेले लाखो शेतकरी आता पुढच्या यादीच्या प्रतिक्षेत आहेत.


शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील -
दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसाचा सर्वाविध फटका बसलेल्या मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या यादीत नावं आलीय, असे शेतकरी आज समाधानी दिसत आहेत. अस्मानी संकटामुळे कर्जाचा डोंगर मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर उभा राहिलाय. ते कसं कमी करायचं, याची चिंता असताना कर्जमाफीच्या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा धीर मिळालाय. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्याही कमी होतील, अशी भावना लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आज डोक्यावरच ओझं कमी झालय असं बोलताना त्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

कोणतेही कागदपत्र न देता कर्जमाफी -
महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीची आज पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत नांदेड जिल्ह्यातील कामठा आणि सोनखेड या गावातील शेतकऱ्यांना स्थान मिळाले. या पहिल्या यादीत जिल्ह्यातील एकूण 533 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. 5 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यादी जाहीर होताच शेतकऱ्यांनी सेवा केंद्रावर यादी पाहण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र या गावांत पाहायला मिळाले. कर्जमाफीच्या यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांच्या चेहेऱ्यावर प्रचंड आनंद दिसून आला. कोणतेही कागदपत्र न देता ही कर्जमाफी मिळाल्याने जास्त आनंद झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. तर, वाशीम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून या घोषणेमुळे शेतकरी वर्ग सुखावला असून शासनाचे आभार शेतकरी मानत आहेत.

Farmers Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

कोल्हापुरात दोन ठिकाणी योजनेचा शुभारंभ -
कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले आणि हातकणंगले तालुक्यातील हेरले याठिकाणी योजनेच्या कामाला सुरुवात झालीय. जिल्ह्यातील 50 हजार 618 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केलाय. थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्याचे काम सुरु झालंय. आसुर्ले येथील 116 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहु नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील 50 हजार 618 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास 372 कोटी रूपयांची कर्जमाफी होवून हे शेतकरी कर्जमुक्त होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिलीय. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ झालं आहे, त्यांनी समाधान व्यक्त केलंय. अनेक शेतकऱ्यांचे 4 वर्षांपासून कर्ज थकीत होतं.

शेतकरी कर्जमाफी योजनेचा हिंगोलीतील समगा गावातून शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते आपले सरकार केंद्रावर पहिल्या शेतकऱ्याला कर्जमाफीची पावती देऊन सन्मान करण्यात आला. लाजी पुरभाजी कुरवडे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सन्मान केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

अशी असणार यादी -
शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली. त्यापैकी 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे. जिल्हा पातळींवर कर्जमाफीचं काम सुरु झालं आहे.

Crop Loan | पीकविमा काढायचा की नाही हे आता शेतकरी ठरवणार, मोदी सरकारचा निर्णय | ABP Majha