सोलापूर : सातत्यानं या ना त्या कारणाने चर्चेत राहणारे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. देशमुखांनी अग्निशमन दलासाठी आरक्षित जागेवर बंगला बांधल्याचा आरोप आहे.


आरक्षित जागेवर नियमबाह्य आणि बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका सुभाष देशमुखांवर ठेवण्यात आला आहे. अग्निशमन दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सुभाष देशमुखांनी आलिशान बंगला बांधल्याचं समोर आलं.

सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाच्या बेकायदा बांधकाम विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात महानगरपालिका आयुक्तांनी सुभाष देशमुखांना सुनावणीसाठी 17 मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेत हजर राहून आपली बाजू मांडण्याची नोटीस सहकार मंत्र्यांना बजावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सुभाष देशमुख काय म्हणाले?

“सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत संबंधित आरक्षित जमीन महापालिकेला नको असल्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. बांधकामासाठी योग्य त्या परवानग्या घेऊन बंगला बांधला आहे. 17 मार्चला आयुक्तांच्या हजेरीत काय निर्णय होईल ते पाहू.”, अशी प्रतिक्रिया सुभाष देशमुख यांनी दिली.