औरंगाबाद : औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला आहे. खदान परिसरात कचरा टाकण्यास तात्पुरता आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


औरंगाबादच्या कचराप्रश्नी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी खदान परिसरात कचरा टाकण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय आश्वासन दिले?

“औरंगाबाद येथील खदान परिसरात तात्पुरती कचरा टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहे. पोलिसांनाही संयमाने प्रकरण हाताळण्यासाठी सांगितले आहे.”, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर सांगितले.



तसेच, "उद्या औरंगाबाद कचरा प्रश्न मार्गी लागेल. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे", असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, उद्या महापालिका आयुक्त आणि शिवसेनेचे खासदार-आमदार भूखंड पाहणी करणार आहेत.

कचरा प्रश्नाला हिंसक वळण

गेल्या 20 दिवसांपासून सुरु असलेल्या औरंगाबादेतील कचरा प्रश्नाला हिंसक वळण लागलं. मिटमिटा आणि पडेगावात कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्यांची स्थानिकांनी तोडफोड करत पेटवून दिल्या. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. परिणामी संतप्त झालेल्या स्थानिकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली.  या दगडफेकीत 3 अधिकारी आणि 9 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावर वाहन्यांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. यातील 5 ते 6 खासगी गाड्याही ग्रामस्थांनी फोडल्यात तसेच शंभरपेक्षा अधिक दुकाचाकींचंही नुकसान केलं आहे.