कर्ज फेडण्यासाठी हुंड्याची मागणी, विवाहितेची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 28 Apr 2017 04:14 PM (IST)
सोलापूर : एकीकडे 'एबीपी माझा'च्या पुढाकाराने राज्यभरातील तरुणाई हुंड्याविरोधात एकवटली असताना सोलापुरात हुंडाबळीची विदारक घटना समोर आली आहे. मोहोळमध्ये हुंड्याच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली आहे. शहनाज मुलाणी या महिलेने हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं. गृहकर्जाचा हप्ता फेडण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेवर सासरच्यांनी दबाव आणल्याचा आरोप आहे. विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी मोहोळ पोलिसात 8 दिवसांनी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती शकील मुलाणीसह सासू, सासरे आणि दीरावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. शहनाज मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम गावची रहिवासी होती. 5 मे 2015 रोजी सोलापूरमधील बार्शीतल्या शकील मुलाणीसोबत तिचा विवाह झाला होता. कळसेनगरात नांदायला आलेल्या शहनाजचा पैशांसाठी छळ होत असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी शहनाजकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. या जाचाला कंटाळून 19 एप्रिलला शहनाजने स्वतःला पेटवून घेतलं. 20 तारखेला तिचा मृत्यू झाला. चौकशीनंतर मोहोळ पोलिसांनी पती शकील मुलाणीसह सासू, सासरे आणि दीरावर गुन्हा दाखल केला आहे.