सोलापूर: मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, अशी चिठ्ठी लिहून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.


धनाजी चंद्रकांत जाधव (वय 45) असं या शेतकऱ्याचं नाव असून, ते करमाळा तालुक्यातील वीट या गावचे रहिवाशी होते.

धनाजी जाधव हे शेतकरी संपात सहभागी झाले होते. कर्जबारीपणाला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपवली.

जाधव यांच्यावर सावकार आणि बँकेचे कर्ज होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी वस्ती लगत असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली असून जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करु नका, असं या चिठ्ठीत म्हटलं आहे.

ही चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली आहे.

दरम्यान, वीट गावातील नागरिकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. मुख्यमंत्री राहूदे पण किमान पालकमंत्री तरी आले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या मागणीनंतर सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख हे वीट गावाकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारीही आहेत.