सोलापूर : स्मार्टफोनवर तासनतास वेळ वाया घालवणाऱ्या तरुणांना सोलापुरातल्या एका विद्यार्थ्याने याच वेळेचा सदुपयोग कसा करता येईल, याचं उदाहरण घालून दिलं आहे. सोलापुरात बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची आंतराष्ट्रीय ब्लॉगर म्हणून निवड झाली. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या हस्ते ओंकार जंजीरालचा गौरव होणार आहे.


जगातील 30 ब्लॉगर मधून गुगलने सोलापूरच्या ओंकारची निवड केली. सिलिकॉन व्हॅलीत 15 ऑगस्टला सुंदर पिचाई ओंकारला प्रमाणपत्र प्रदान करतील.

ओंकार जंजीराल हा मातोश्री गंगुबाई केकडे ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. गुगलने ओंकारला तातडीने  अमेरिकेला बोलावलं आहे. अमेरिकेला येण्या-जाण्याचा खर्चही गूगल करणार आहे.

लहानपणीच ओंकारच्या आई-वडिलांचं अपघाती निधन झालं. त्यामुळे त्याचं पालनपोषण आजी-आजोबांनी केलं. पाचवीत असताना ओंकारने स्वतःची वेबसाईट तयार केली. त्यानंतर ओंकारने ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली.

भारतीय मसाले या विषयावर त्याने लिहिलेल्या ब्लॉगला जास्त पसंती मिळाली आहे. आजतागायत ओंकारने 3 हजार ब्लॉग लिहिले आहेत.

भविष्यात गूगलसोबत डिजिटल मार्केटिंग करण्याचा मानस ओंकार जंजीराल याने व्यक्त केला. तरुणांनी सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा इंटरनेटचा चांगला वापर केल्यास करिअर घडू शकतं, असंही ओंकार म्हणतो.