Solapur : राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहेत. या परिस्थितीत मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना केले आहे. यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मंदिर समिती बैठकीत घेण्यात आला. 

Continues below advertisement


पुरग्रस्त नागरिकांना विठुरायाच्या प्रसादरूपाने महावस्त्रे देखील वाटप करण्यात येणार


पूरग्रस्त भागातील नागरिकांचे उभे संसार वाहून गेल्याने हजारो बाधितांना अंगावर घालायला कपडे देखील नाहीत. यामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. याचाच विचार करून पुरग्रस्त नागरिकांना विठुरायाच्या प्रसादरूपाने महावस्त्रे देखील वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले. मंदिर समिती प्रत्येकवेळी पुरग्रस्त नागरिकांना फुड पॅकेट वाटप करीत असते. ह्यावेळी जिल्हा प्रशासनास देखील आवश्यक ती मदत करण्यात येत असून, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंदिर समितीकडून यापूर्वीही राज्यावर आलेल्या आपत्तीच्या काळात मदत केली गेली आहे. विशेष म्हणजे सन 2013, 2015, 2018 व 2020 या काळातही मंदिर समितीमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती.


राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क रहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आले आहे.


जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष 24X7 कार्यरत ठेवावेत. शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करण्यात यावे. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक आणि जुन्या इमारतीवर CSSR च्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. वीज व रस्ते पायाभूत सुविधासाठी दुरुस्ती पथक, साखळी आरे व फीडर संरक्षण युनिट तैनात करावे.  कोकण व वरच्या खोऱ्यातील मध्यम धरणात पाणी साठा,  विसर्ग याचा नियमित आढावा घेण्यात यावा.  संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने  आपत्ती पूर्व सूचना SMS, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात याव्यात. नागरिकांनीही सतर्कता बाळगावी अशा सूचना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.