शैलेश घोंगडे घरात खूप त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून वडील सुरेश घोंगडे यांनी मुलाला मारण्यासाठी शेताच्या जवळ राहणाऱ्या शंकर वडजेला दोन लाख रुपयांची सुपारी दिली. सोलापुरातील एका हॉटेलमध्ये त्याच्या हत्येचा कट शिजला. 29 जानेवारी रोजी कुंभारी हद्दीत पोलिसांना शैलेश घोंगडे बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्याच्या गळ्याभोवती खुणा आढळल्याने, त्याचा गळा आवळून हत्या केल्याची शंका पोलिसांना आली. त्यानुसार सोलापूर ग्रामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांची चौकशी केली. यामध्ये शैलेशचे वडील सुरेश घोंगडे यांनीच हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की, "शैलेश घरी खूप त्रास देत होता. त्यामुळे शेताजवळ राहणाऱ्या शंकर वडजेला त्याच्या हत्येची सुपारी दिली."
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी वडील सुरेश घोंगडे यांच्यासह शंकर वडजे, संजय राठोड, राहुल राठोड या तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे. या चौघांना अक्कलकोट न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.