Solapur Latest Updates : ड्रेनेजमध्ये पडून झालेल्या (Solapur Drainage Accident) चौघांच्या मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या संबधित विभाग, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी, कंत्राटदार असलेल्या दास आफशोअरचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी, ब्रज कन्ट्रक्शन संबंधित अधिकारी आणि कर्मचारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा संबंधित विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी ड्रेनेज लाईन दुरुस्ती करताना सोलापुरात चार जणांचा मृत्यू झाला होता. 


तर दोघे या घटनेत जखमी झाले होते. मात्र काम करत असताना सुरक्षेची कोणतीही साधनं, ऑक्सिजन मास्क, सेफ्टी बेल्ट इत्यादी कोणतीही साधने देण्यात आलेली नसल्याचा आरोप कामगारांना केला होता. या प्रकरणी काल प्रहार संघटनेने गुन्हा दाखल करून मृतांच्या नातेवाईकांना मदत होई पर्यंत आंदोलन सुरू केले होते. पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे दिले होते. काल रात्री उशिरा सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी जबाबदार असलेल्या पालिकेचा संबंधित विभाग, कंत्राटदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम 304 (अ) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना सोलापूर महानगरपालिकेडून मदतीची घोषणा


ड्रेनेजमध्ये पडून मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना सोलापूर महानगरपालिकेने मदतीची घोषणा केली. चारही मृतांच्या नातेवाईकांना पालिकेने 10 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तर जखमींचा खर्च देखील पालिका उचलणार असल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली होती. ड्रेनेज लाईनचे काम करत असताना सोलापुरात झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता. एका मजुराला वाचवण्यासाठी एकामागून एक गेलेले सहा जण ड्रेनेजमध्ये पडले होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला.


अक्कलकोट रस्त्यावरील सादुल पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली होती. अक्कलकोट या चार पदरी रस्त्याचे काम सुरू आहे. चार पदरी रस्त्यांमुळे अगोदरच ड्रेनेजची कामे केली जात आहेत. बैचन परभू ऋषीदेव (वय, 36. रेवाडी, गुहाटी जि. अटरिया, बिहार), आशिषकुमार भारतसिंग राजपूत (वय 17, मगलाबहु मैनपुरी, उत्तरप्रदेश), विशाल हिप्परकर (वय 25, रा. जत, जि. सांगली) आणि सुनील ढाका (वय 25 रा. राजस्थान) अशी मृत कामगारांची नावे आहेत. हरिषशंकर बुरीर (वय 35, रा. उत्तरप्रदेश) आणि सैफन शेख ( वय -39, रा. नवीन विडी घरकुल, सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.


शहरातील विविध ठिकाणी दास कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या माध्यमातून अमृत योजनेंतर्गत ड्रेनेजलाईन टाकली जात आहे. हद्दवाढ भागात 2016 पासून ड्रेनेज टाकण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम हाती घेण्यात आले होते. ते काम अतिशय संथगतीने सुरु असून तब्बल पाच वर्षात 297 किलोमीटरपर्यंत काम होणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 50 टक्‍क्‍यांपर्यंतच काम पूर्ण झाले आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: