सोलापूर : पोलीस पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची संधी साधत त्याच्या पत्नीवर वसाहतीत राहणाऱ्या पोलिसानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. रवी मल्लिकार्जुन भालेकर असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.


आरोपी रवी भालेकर हा सोलापूर शहर पोलिसांत पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. यापूर्वी तो सोलापूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत होता. तर पीडीत महिलेचे पती आणि आरोपी रवी दोघेही एकाच खात्यात होते. तसेच दोघांचे कुटुंब राहण्यास देखील एकाच पोलीस वसाहतीत होते. यातूनच आरोपी आणि पीडीतेच्या परिवाराची ओळख निर्माण झाली होती. 


याच ओळखीतून आरोपी पीडीतेशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच वारंवार पीडीतेच्या घरी जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत होता. तसेच मोबाईलवर मेसेज करुन जवळीक साधण्याचा सतत प्रयत्न करत होता. अशी तक्रार पीडीत महिलेने दिली आहे. दरम्यान 23 एप्रिल रोजी पीडीत महिलेचे पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना कोरोना सेंटरमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. हीच संधी साधत रात्री उशीरा आरोपी रवी पीडीतेच्या घरी गेला. 


आरोपी रवी याने घरात जात दाराची कडी लावली तसेच माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला आवडते. गोंधळ केल्यास तुझीच बदनामी होईल, असे म्हणत तिच्याबरोबर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोपी पीडीतेने केला आहे. पीडीत महिलेच्या तक्रारीनंतर फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांदवि कलम 354 (अ), 354, 376 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलीस शिपाई रवी भालेकर यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसानेच आपल्या सहकारी पोलिसाच्या पत्नीवर बलात्कार केल्याच्या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस दलात या घटनेबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहेत. सोलापुराती फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून घटनेचा पुढील तपास पो.स.ई तळे या करत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :