सोलापूर : सोलापुरात मागील काही दिवसांपासून रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र सोलापुरच्या प्रशासन आणि खासगी डॉक्टरांनी या तुटवड्याचे खापर रुग्णांच्या नातेवाईंकावर फोडलंय. गरज नसतानाही रुग्णांच्या नातेवाईकांकडून रेमडेसिवीरचा आग्रह केला जात असल्याचा अजब दावा खासगी कोविड हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन तोष्णीवाल यांनी केला. तर काही डॉक्टरांकडून अशाच पद्धतीची तक्रार प्राप्त झाल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. 


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक अधिक हुशार झाले आहेत. त्यात माध्यमांमध्ये सतत रेमडेसिवीरचा तुटवडा असल्याच्या बातम्या येतात. त्यामुळे डॉक्टरांपेक्षा रुग्णांच्या नातेवाईकांच्या डोक्यात रेमडेसिवीरच बसले आहे.  अशात उपचार करण्यासाठी लोकांकडे त्याकाळात पैसा जास्त असतो. त्यामुळे रुग्ण दाखल झाल्या झाल्या रेमडेसिवीर लिहून देण्याची मागणी करतात. असा अजब दावा खासगी कोविड हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन तोष्णीवाल यांनी केला. 


सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज रेमडेसिवीर आणि ऑक्सीजन तुटवड्यासंदर्भात डॉक्टर आणि प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव, सिविल सर्जन प्रदीप ढेले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत खासगी रुग्णालयांची बाजू मांडाताना खासगी कोविड  हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन तोष्णीवाल यांनी रेमडेसिवीर औषधाच्या तुटवड्याचे पूर्ण खापर रुग्णांच्या नातेवाईंकावर तसेच माध्ममांवर फोडले. 


"रेमडेसिवीर दिल्याने वायरसचा लोड कमी होतो. स्वाईन फ्लूच्या वेळी टॅमिफ्लू नावाचे औषध देखील याच कारणामुळे दिले जात होते. आम्ही 2 हजार कोरोना बाधित रुग्णांना रेमेडिसिवर औषध दिले. तर 2 हजार रुग्णांना रेमडेसिवीर न देता केवळ इतर उपचार केले. या सर्व रुग्णांची नंतर तपासणी केली असता निष्कर्ष सारखाच आला. रेमडेसिवीर मिळाले नाही तरी चिंता करण्याची गरज नाही. " अशी माहिती देखील खासगी कोविड हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन तोष्णीवाल यांनी दिली. 


तत्पूर्वी "80 ते 85 टक्के कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिवीरची आवश्यकता नसते. केवळ गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांवर रेमडेसिवीरचा वापर करण्याच्या सुचना टास्क फोर्सने दिला आहे. रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर केल्यास त्याचे विपरीत परिणाम होतात. काही ठिकाणी गरजेपेक्षा जास्त रेमडेसिवीरचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. मात्र रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर केल्याच त्याचे किडनी आणि लिव्हरवर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे केवळ गरजूंनाच रेमडेसिवीर  देण्यात यावे" अशी माहिती सोलापुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.