सोलापूर: मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन दिलेल्या आश्वासनानंतर आता करमाळ्यातल्या नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं आहे.
मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, अशी चिठ्ठी लिहून धनाजी चंद्रकांत जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. वीट गावातील या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर करमाळ्यात आंदोलन करण्यात आलं होतं.
त्यामुळे पालकमंत्री विजय देशमुख यांनी वीट गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन बोलणं करुन दिलं.
मुख्यमंत्र्यांनी पीडित जाधव कुटुंबियांतील मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि तातडीनं आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं. एका मुलाला नोकरी आणि दुसऱ्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे. तसंच जाधव कुटुंबाला तातडीने एक लाख रुपये मदत आणि त्यानंतर पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. जाधव कुटुंब अल्पभूधारक असल्यानं, शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर करमाळ्यातील आंदोलन मागे घेण्यात आलं.
पालकमंत्र्यांना घेरलं
दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख हे पीडित शेतकरी कुटुंबाची भेट घेण्यासाठी वीट गावाकडे निघाले होते. त्यावेळी करमाळ्यात त्यांना घेराव घालण्यात आला. मुख्यमंत्री कुठे आहेत, ते का आले नाहीत असे सवाल गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांना विचारले.
करमाळ्यात रास्ता रोको
आत्महत्या केलेल्या विजय जाधव यांच्या इच्छेप्रमाणं मुख्यमंत्र्यांनीच गावात यावं, आणि शेतकऱ्याच्या अंतयात्रेला हजेरी लावावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्या मागणीसाठी करमाळ्यात रास्ता रोको करण्यात आला होता.
मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याची चिठ्ठी
मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, अशी चिठ्ठी लिहून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
धनाजी चंद्रकांत जाधव (वय 45) असं या शेतकऱ्याचं नाव असून, ते करमाळा तालुक्यातील वीट या गावचे रहिवाशी होते.
धनाजी जाधव हे शेतकरी संपात सहभागी झाले होते. कर्जबारीपणाला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपवली.
जाधव यांच्यावर सावकार आणि बँकेचे कर्ज होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी वस्ती लगत असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली असून जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करु नका, असं या चिठ्ठीत म्हटलं आहे. ही चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली आहे.