रेल्वेच्या खांबाला डोकं आपटून तरुणाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2016 07:52 AM (IST)
सोलापूर : चालत्या रेल्वेत दरवाजाजवळ मोबाईलवर बोलणं एका विद्यार्थ्याला महागात पडलं आहे. कारण सिग्नलच्या खांबाला डोकं आपटून 22 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सोलापुरातील माढा तालुक्यातील वाकाव इथं ही दुर्घटना घडली. अक्षय चतुर्भूज बारबोले असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो सोलापुरातील कल्याणनगरचा रहिवासी होता. काय आहे प्रकरण? अक्षय बारबोले हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी कुर्डुवाडीला जात होता. हुतात्मा एक्स्प्रेसने तो कुर्डुवाडीकडे निघाला होता. यावेळी वाकाव जवळ तो मोबाईलवर बोलत होता. मात्र त्याला रेंज मिळत नसल्यामुळे तो फोनवर बोलत रेल्वेच्या दरवाजाजवळ आला. मात्र फोनवर बोलण्याच्या नादात त्याचं डोकं रेल्वे सिग्नलच्या खांबाला जोरात आपटलं. यामुळे तो खाली कोसळला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या अक्षयला रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर आणलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत केलं.