रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानच्या पूल वाहून गेला आहे. या पुरात 2 एसटी बसेस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेली असून, यामध्ये 22 जण बुडाल्याची भीत आहे.
याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन दिलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, "या पुलाचं मे महिन्यातच ऑडिट झालं होतं. पूल ब्रिटीशकालीन होता, पण त्याची पाहणी झाली होती. पूल प्रवासासाठी सुरक्षित होता. मात्र हा अहवाल ज्यांनी दिला, त्यांची आता चौकशी करु"
अजित पवार आक्रमक
चंद्रकांत पाटलांच्या निवेदनावर अजित पवारांनी जोरदार आक्षेप नोंदवला. जर पाहणी झाली होती, मग पूल कोसळलाच कसा? पूल कोसळेपर्यंत राज्य सरकारने खबरदारी का घेतली नाही? हवामान खात्याने इशारा देऊनही वाहतूक का रोखली नाही? असे सवाल करत, राज्य सरकारच या दुर्घटनेला जबाबदार असून, चंद्रकांत पाटलांवर कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अजित पवारांनी केली.
पृथ्वीराज चव्हाण
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्य सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. मंत्रिमहोदयांनी निवेदन दिल्याप्रमाणे, जर पाहणी झाली असेल, तर या दुर्घटनेला जे जे अधिकारी जबाबदार आहेत, त्या सर्वांवर कारवाई व्हावी, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
सावित्री नदीवर भीषण दुर्घटना
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानच्या पूल वाहून गेला. या पुरात 2 एसटी बसेस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री 11.30 वाजता ही भीषण दुर्घटना घडली.
या घटनेत पुलावरुन जाणारी वाहनं देखील पुरात वाहून गेली आहेत. वाहून गेलेल्या वाहनांमध्ये राजापूर बोरिवली आणि जयगड-मुंबई या दोन बस आणि 5 ते 7 गाड्यांचा समावेश आहे.
LIVE : महाड पूल दुर्घटना : दोन एसटी बसमधील 22 जण बुडाल्याची भीती