बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. गेली 2 वर्षे विकास कामांच्या नावाखाली सर्व रस्ते खोदुन गटारी केल्या मात्र नंतर रस्ते केलेच नाहीत. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बार्शीतील एका सामाजिक कार्यकर्त्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची दखल आयोगाने घेतली असून पुढील कार्यवाहीसाठी राज्य मानवाधिकार आयोगाकडे सोपवली आहे. काही दिवसात या तक्रारीवर सुनावणी मानवाधिकार कोर्टामध्ये होणार आहे.


बार्शीत गेली दोन वर्षे चालू असलेल्या अंडरग्राउंड गटारीसाठी रस्त्याचे खोदकाम चालू होते. अंडरग्राउंड गटारीचे काम पूर्ण झाले, परंतु रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार आहे. या कलमाची व्याप्ती खूप मोठी आहे. माणसाला सुखकर जीवन जगण्यासाठी महत्वाचे सर्व घटक यात अंतर्भूत आहेत. इतर घटकांप्रमाणे चांगले रस्ते हा सुद्धा सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा एक घटक आहे. अनेक उच्च न्यायालयांनी विविध खटल्यात स्पष्ट केलं आहे की चांगले व खड्डे मुक्त रस्ते असणे हा प्रत्येक भारतीयांचा मूलभूत अधिकार आहे.परंतु या अधिकाराची सर्रासपणे पायमल्ली होतांना दिसत आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली होती.



मानवाधिकार आयोगाने केलेल्या तक्रारीतील महत्वाचे मुद्दे




  • मानवाचे अपघात आणि मानवाच्या शरीरावर परिणाम होत आहे.

  • धुळीमुळे मानवाच्या श्वसनावर परिणाम होऊन दम्याचे आजार होत आहे.

  • तसेच धुळीमुळे डोळ्यांवर देखील परिणाम होत आहेत.

  • रस्त्याच्या कडेवरील दुकाने, हॉटेल मधील खाद्यपदार्थांवर धुळे मुळे रोगराई होत आहेत.

  • सतत आरोग्याची तपासणी करून अनेक आर्थिक अडचणी येत आहेत.

  • सर्वात जास्त म्हणजे त्याचा परिणाम लहान मुलांवर होत आहेत.

  • रस्ते खराब असल्यामुळे वाहने खिळखिळा होत आहेत. त्यामुळे मेंटेनन्सचा खर्च वाढून मानसिक ताण येत आहेत.

  • वाहनांची सतत दुरूस्ती करावे लागत असून आर्थिक अडचण येत आहे.



बार्शी येथील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यात प्रामुख्याने आरोग्याच्या प्रश्नासोबतच वाहनांची खराबी होऊन लोकांचा आर्थिक त्रास सुद्धा वाढत आहे. गेली दोन वर्षे हा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. परंतु याकडे सर्वप्रकारे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असं मनीष देशपांडे यांनी म्हटलं आहे. बार्शीमधील प्रशासनाला सुद्धा त्यांनी विनंती केली आहे कि रस्ते लवकरात लवकर पूर्ण करावे व बार्शी मधील नागरिकांचा त्रास कमी करावा.