Solapur Barshi Froud Case : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात (Solapur Barshi) सध्या 'फटे'ची चर्चा आहे. हे प्रकरण विशाल फटे नावाच्या व्यक्तिशी संबंधित आहे. विशाल फटेनं बार्शी आणि सोलापुरातील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला असून सध्या तो फरार आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सुरु आहे तर अनेक गोरगरीबांना देखील विशाल फटेनं चुना लावला आहे. दरम्यान, सोलापूरच्या बार्शीतील विशाल फटेच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांच्या ठेवी परत मिळू शकतात. पण यासाठी तपास यंत्रणांनी फटेच्या मिळकती आणि बँक खाती तातडीनं सील करायला हवीत, असं मत आर्थिक गुन्ह्यांचे निवृत्त तपास अधिकारी अविनाश मोकाशी यांनी मांडलं आहे. समाज हायटेक झाला पण 'आर्थिक साक्षरता' मात्र आलीच नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. भविष्यात अशी कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून ही आर्थिक साक्षरता सर्वांमध्ये येणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.
मोकाशी म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. यात अनेक गोरगरीबांचे पैसे अडकले आहेत. आता केस रजिस्टर झालीय तर तपास वेगाने व्हायला हव्या. आता त्याची अकाऊंट सीज करणं गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी त्याचा पैसा पोहोचला आहे तो पैसा सीज करणं आता गरजेचं आहे. तो पैसा लवकर सीज झाला तर ठेवीदारांना देता येऊ शकतो असं मोकाशी म्हणाले.
काल विशाल फटेच्या वडिलांसह भावाला अटक
बार्शीतील 'फटे स्कॅम' प्रकरणात पहिली अटक झाली आहे. मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्य आरोपी विशाल फटे याचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे यांना पोलिसांनी पकडलं. मध्यरात्री सांगोला येथून स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात घेतलं. कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणी विशाल फटेसोबत परिवारातील 4 सदस्य देखील आरोपी आहेत. त्यापैकी दोघे जण आता ताब्यात आले आहेत. मुख्य आरोपी विशाल फटे अद्यापही फरार आहे. अंबादास फटे, भाऊ वैभव फटे या दोघांना बार्शी न्यायालयानं पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा पाऊस
मागील आठवड्याभर केवळ चर्चा सुरु असलेल्या बार्शीतल्या स्कॅमप्रकरणी काल गुन्हा दाखल झाला होता. आरोपी विशाल फटे याचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या दीपक आंबरे यानेच शेवटी या प्रकरणात फिर्याद दिली . विशालने बार्शीतल्या कित्येक लोकांना फसवल्याचं बोललं जात असताना त्याने मित्रांना देखील सोडलेलं नाही. दीपक आंबरे यांच्यासह अनेक जवळच्या मित्रांना देखील विशाल फटेने कोट्यवधींची फसवणूक केली आहे. दीपक यांच्या फिर्यादीनंतर बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा पाऊस पडतोय. गुन्हा दाखल होत असताना केवळ 6 लोकांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर मात्र एका दिवसात आणखी 40 लोकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या