शिर्डी : बिबट्याने चिमुकलीला उचलून नेऊन ठार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात घडली आहे. साडेतीन वर्षाच्या मुलीला बिबट्याने ऊसाच्या शेतात ओढून नेलं. त्यानंतर नातेवाईकांनी शोधाशोध केल्यानंतर चिमुकली जखमी अवस्थेत शेतात सापडली, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावातील भोरमळा येथील ही धक्कादायक घटना आहे. मळ्यामध्ये वस्तीवर राहणाऱ्या तेजस मधे यांच्या साडेतीन वर्षाच्या प्राजक्ता हिला संध्याकाळी बिबट्याने ओढत जवळील शेतात नेलं. जवळच असलेल्या प्राजक्ताच्या आईने हा सगळा प्रकार पाहून मोठ्याने हंबरडा फोडला.
प्राजक्ताच्या आईचा आवाज ऐकून आजूबाजूचे गावकरी जमा झाले आणि रात्रीच्या अंधारात प्राजक्ताचा शोध सुरु केला. दोन तासानंतर ऊसाच्या शेतात प्राजक्ता सापडली. मात्र बिबट्याने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
शिकारीच्या शोधात असणारे बिबटे वारंवार नागरिकांवर आणि लहान मुलांवर हल्ले करण्याच्या घटना या परिसरात वाढल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे नरभक्षक झालेल्या या बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर आणखी कित्येकांचा बळी असा प्रश्न सर्वांना पडला आहे.