वर्धा : सध्या अनेक रुग्ण कोरोनाची लक्षणं नसलेले आढळून येत आहेत. सध्या लक्षणं नसलेल्या प्रत्येकाची टेस्ट करणं शक्य होत नाहीय. यामुळं 'सिक्स मिनट वॉक टेस्ट'मधून जोखमीतील रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. याला सोबत 'वन मिनट सीट अप' म्हणजेच एक मिनिट उठाबशा काढण्याचाही पर्याय देण्यात आला आहे. वर्ध्यात दत्तपूर इथल्या कंटेंन्मेंट झोनमध्ये अशी तपासणी करण्यात आली आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने शिफारस केल्यानुसार सिक्स मिनट वॉक टेस्टच्या माध्यमातून शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजून कोरोना संसर्गासाठी गंभीर जोखमीच्या असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे. सोबतच वन मिनट सीट अप टेस्टचाही पर्याय ठेवण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह, संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची संख्या मोठी आहे. तसेच एखादा रुग्ण आढळल्यास प्रतिबंधीत केला जाणारा परिसरही मोठा असतो. सध्या कोरोनाची अनेकांना लक्षणेदेखील दिसत नसल्याचे पुढे आले आहे. अशा स्थितीत रुग्णांचा शोध घेणे देखील अवघड होते. प्रत्येकाची चाचणी करणे शक्य होत नाही.
अशा परिस्थितीत रुग्ण आढळल्यानंतर प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांची आणि विलगीकरणात असलेल्यांची माहिती संकलित ठेवण्याचे कार्य आशा सेविकांकडून केलं जात आहे. त्यामुळे त्यांना अशी माहिती घेण्यासोबतच रुग्णांचीही माहिती मिळावी, याकरीता सिक्स मिनट वॉक टेस्ट, एक मिनट सीट अप टेस्टची माहिती देण्यात आली आहे. या टेस्टच्या माध्यमातून देखील रुग्णांची माहिती संकलीत केली जाणार आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे वरकरणी दिसत नसली तरीही रुग्णांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
दत्तपूर येथील कन्टेनमेंट झोनमध्ये वैद्यकीय जनजागृती मंच आणि आयएमएच्या संयुक्त विद्यमाने याचे प्रात्याक्षिक करून दाखवत आशा सेविकांना माहिती देण्यात आली. यावेळी 46 जणांची सिक्स मिनट वॉक टेस्ट घेण्यात आली. सिक्स मिनिट वॉक टेस्टमध्ये सलग सहा मिनिट चालायचे आहे. तर वन मिनिट सिट अप टेस्टमध्ये एक मिनिट उठाबशा काढायच्या आहेत. जे चालू शकत नाही, त्यांना वन मिनट सिट अप टेस्टचा पर्याय देण्यात आला आहे.
टेस्ट पूर्वी आणि टेस्टनंतर शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ऑक्सिमीटरने तपासले जाणार आहे. ऑक्सिजनची पातळी 94 च्या खाली असल्यास व्यक्ती गंभीर परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याची शक्यता असल्याने त्यास उपचारार्थ दाखल केले जाऊ शकते. यामध्ये कोविडच नव्हे तर अस्थमा, दमा, हृदयरोग, इतर फुफ्फुसाचे आजार, न्यूमोनिया या आजाराचीही माहिती मिळू शकते. त्यामुळे हाय रिस्ककडे जावू शकणाऱ्या व्यक्तींवर विशेष देखरेख ठेवता येऊ शकते. प्रत्येकाची टेस्ट करणं शक्य नसल्यानं हा पर्याय महत्वाचा ठरू शकतो. यातून कोविड संशयितच नव्हे तर इतरही रुग्णांची माहिती घेणं शक्य होणार आहे.
'सिक्स मिनट वॉक टेस्ट'मधून कळणार कोरोना संशयित रुग्णांची माहिती, वर्ध्यात प्रयोग
महेश मुंजेवार, एबीपी माझा
Updated at:
25 Jun 2020 10:29 AM (IST)
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने शिफारस केल्यानुसार सिक्स मिनट वॉक टेस्टच्या माध्यमातून शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजून कोरोना संसर्गासाठी गंभीर जोखमीच्या असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे.
प्रत्येकाची टेस्ट करणं शक्य नसल्यानं हा पर्याय महत्वाचा ठरू शकतो. यातून कोविड संशयितच नव्हे तर इतरही रुग्णांची माहिती घेणं शक्य होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -