सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकतो. कोरोनामुळे जग ठप्प झालं. त्यामुळे अनेकांनी वर्कफ्रॉम होम तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरु केलं. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने ऑनलाइन अभ्यासासाठी मुलांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आले. याच मोबाईलच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुळशीवृंदावनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील विजय तुळसकर या मुलाने स्पॅनिश, इटालियन आणि जर्मन या देशाच्या भाषा डुलिंगो या अॅपच्या माध्यमातून शिकल्या. त्यासोबत लहानपणापासून संगीताची आवड असल्याने हार्मोनियमही उत्तम प्रकारे शिकला असून हार्मोनियम सरळ तर वाजवतोच मात्र उलट करून, उलट्या दिशेने, झोपून अशा पध्दतीने तो एकही स्वर आजूबाजूला न करता उत्तम हार्मोनियम वाजवतो. 1111 पर्यंतचे पाढे अगदी तोंडपाठ. नेपाळ, अमेरिकेसह 20 देशांची राष्ट्रगीतंही त्याच्या तोंडपाठ आहेत.
मोबाईलच्या माध्यमातून आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर विजय तुळसकरला ब्रह्मांडापलीकडे काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. इयत्ता तिसरीमध्ये त्याचे 1111 पर्यंतचे पाढे अगदी तोंडपाठ आहेत. आकडेमोडीत तर तो कॅल्क्युलेटरलाही मागे टाकतो. चीन, नेपाळ, अमेरिकेसह 20 देशांची राष्ट्रगीतंही तो चांगल्या तालासुरात गातो, तेही हार्मोनियमवर. विजयला मोठं होऊन वैज्ञानिक व्हायचं त्याचं स्वप्न आहे.
दिनेश तुळसकर यांचा गावात टेलरींगचा व्यवसाय आहे. त्यातूनच ते आपल्या तीनही मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवतात. विजय हा त्यांच्या घरात जन्मलेला कोहिनूर हिराचं म्हणावा लागेल. विजय नुकताच इयत्ता तिसरीतून चौथीत गेलाय मात्र तिसरीत असतानाचं त्याने चक्क 1111 पर्यंतचे पाढे तोंडपाठ केलेत. विजय इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेत असल्याने हे सर्व पाढे तो इंग्लिशमध्ये न चुकता सुफरफास्ट गतीने बोलून दाखवतो. तर स्पॅनिश, जर्मन, इटाली भाषाही त्याने अवगत केल्या आहेत.
विजयला हे एवढं ज्ञान काही जादूने प्राप्त झालेलं नाही. तर त्यासाठी त्याने इंटरनेटचा योग्य वापर केला आहे. डुलिंगो या अॅपच्या माध्यमातून स्पॅनिश, जर्मन, इटाली भाषाही त्याने अवगत केल्या. घरात एकच मोबाईल असल्याने इंटरनेटवरून शिक्षण घेण्यास विजय आणि त्याच्या दोन्ही बहिणींना काही प्रमाणात अडचणी येत आहेत. विजयकडे आणखी एक असाधारण गुण आहे, तो म्हणजे त्याच संगीत कलेवर प्रचंड प्रेम आहे. हार्मोनियम वादनात तर त्याचा हातखंडा असून नवनवे प्रयोग तो करत असतो. हार्मोनियम तो उलट्या बाजूने, झोपून कशाही पद्धतीने वाजवू शकतो.