Sindhudurg Rain Update: राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे . हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने रविवारी रात्रीपासून चांगलंच झोडपलंय . सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 109 मी .मी . पावसाची नोंद झाली आहे . मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांनी समुद्राला उधाण आलं आहे . समुद्राच्या लाटांनी रौद्ररूप घेतलं असून सध्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहतायत.नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे . (Rain Update)

सिंधुदूर्ग जिल्ह्यात तुफान पाऊस

गेल्या 24 तासांमध्ये सरासरी 109 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद दोडामार्ग तालुक्यात झाली असून येथे तब्बल 142 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सावंतवाडी तालुक्यात 132 मिमी, वेंगुर्ले 129 मिमी, वैभववाडी 122 मिमी, कुडाळ 113 मिमी, मालवण 105 मिमी, देवगड 98 मिमी आणि कणकवली तालुक्यात 95 मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केलं आहे. वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली गेला असून रात्रभर मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे होडावडे पूल पाण्याखाली गेलाय. होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने गेल्या दोन तासांपासून वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गे वाहतूक वळविली आहे.

या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. काही ठिकाणी नदीकाठची शेती पाण्याखाली गेली असून खेड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, समुद्राला उधाण आल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत अजून वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे निचांकी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

हवामान विभागाचा इशारा काय?

हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 48 तासांत अतिवृष्टीची शक्यता आहे. हा इशारा प्रामुख्याने कोकण प्रदेशाच्या काही भागांना लागू आहे, ज्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या बहुतेक भागात शनिवारी संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात पावसाची सुरुवात झाली आहे. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये पुढील दोन दिवसांत वादळासह मुसळधार ते अतिवृष्टी होईल. दरम्यान, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर कोकणच्या इतर अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Weather Update: महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह 16 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील दोन दिवस कसं असेल हवामान?