Pune Kundmala bridge collapse: मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते. यापैकी चार पर्यटकांचा मृ्त्यू झाला होता. तर 51 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत योगेश आणि शिल्पा भंडारे या पती-पत्नीचा जीव वाचला. योगेश बँकेत काम करतात. ते खराडीला (Kharadi) राहतात. रविवारी ते आपल्या पत्नीसोबत कुंडमळा येथे फिरायला आले होते. या दोघांचाही जीव थोडक्यात वाचला. योगेश आणि शिल्पा भंडारे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. योगेश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या दुर्घटनेवेळचा थरार सांगितला. (Pune Rain news)
कुंडमळा पूल इंद्रायणी नदीत कोसळला तेव्हा योगेश आणि त्यांची पत्नी पूलाच्या मध्यभागी होते. योगेश यांनी म्हटले की, मी मृत्यू डोळ्यांदेखत पाहिला. पूल कोसळला तेव्हा पुलाच्या मध्यभागी होतो. ज्या तिघांचा मृत्यू झाला, त्यांचा मृत्यू मी जवळून पाहिला. लोक सांगत होते घाई करू नका, जाऊ नका, पण कोणी ऐकलं नाही आणि हे सगळं घडलं, असे योगेश यांनी सांगितले.
कुंडमळा पुलावरुन नेमके किती जण नदीपात्रात पडले होते, याची माहिती प्रशासनाकडे नाही. सोमवारी सकाळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार कुंडमळा येथे पोहोचले. सध्या कोणी मिसिंग आहे, अशी तक्रार प्राप्त नाही. तरी खबरदारी म्हणून आपण शोध कार्य राबवणार आहोत. पूल रहदारी साठी बंद असताना, त्यावर पर्यटक कसे काय चढले? हा कोणाचा बेजबाबदारपणा? याबद्दल चौकशी सुरु असल्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले.
Indrayani river bridge: पाण्याचा वेग वाढल्याने एनडीआरएफसमोर आव्हान
एनडीआरएफच्या पथकांनी रविवारी रात्रीपर्यंत इंद्रायणी नदीत बचावकार्य करुन अनेकांना बाहेर काढले होते. काल रात्री अंधार पडल्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होते. यानंतर सोमवारी सकाळपासून एनडीआरएफकडून बचावकार्य पुन्हा सुरु केले जाणार होते. मात्र, काल रात्रभर मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे कुंडमळ्याजवळ नदीच्या पाण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाला बचावकार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे.
इंद्रायणी नदीत पडलेले आणखी किती जण बेपत्ता आहेत, याची माहिती अद्याप प्रशासनाला नाही. मात्र, आणखी दोन ते तीन जण बेपत्ता असण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी नदीपात्रात एनडीआरएफकडून शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.
आणखी वाचा