Amboli Rain : यावर्षी राज्यात उशीरा मान्सून (Mansoon) दाखल झाला. जून महिन्यात राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र, त्यानंतर जुलै महिन्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. काही भागात तर पूरस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत (Amboli) गेल्या 45 दिवसांमध्ये तब्बल 4500 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास 31 ऑक्टोबरपर्यंत आंबोलीत पावसाची विक्रमी नोंद होऊ शकते.
आंबोली परिसरात दरवर्षी 9000 मिमी ते 11000 मिलीमीटर पावसाची नोंद होते
आंबोली परिसरात दरवर्षी सरासरी 9000 मिमी ते 11000 मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. देशातील सर्वात जास्त पाऊस कोसळणारे ठिकाण म्हणून 'चेरापूंजी' ची ओळख आहे. चेरापुजीनंतर देशात सर्वाधिक पाऊस महाराष्ट्राच्या आंबोली घाटात कोसळतो. म्हणूनच आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल जातं.
अंबोलीचा निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
राज्यात अंबोलीत सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळं अंबोलीत सर्वत्र हिरवाईनं नटलेले डोंगर, फेसाळत कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, दाट धुकं अनुभवायला मिळतात. अंबोली आणि परिसरात पाच ते सहा महिने सूर्य नारायणाचे दर्शन देखील होत नाही. यावर्षी देखील अंबोलीत चांगला पाऊस सुरु आहे. त्यामुळं तेथील धबधबे ओसंडून वाहत असल्याचं चित्र दिसत आहे. अंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी असं म्हटलं जातं. पावसाळ्यात अंबोलीचा निसर्ग पाहण्यासारखा असतो. या काळात पर्यटक मोठ्या प्रमाणावर निसर्ग, धबधबे पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात. जैव विविधतेनं नटलेल्या या आंबोलीत पाऊस पडत असल्यानं विविध प्रकारचे साप, बेडूक सापडतात. अंबोलीच्या तुलनेत जिल्ह्यात निम्म्याच्या आसपास पाऊस पडला आहे. अंबोलीमध्ये भाऊ ओगले हे पावसाचं प्रमाण मोजतात. गेली अनेक वर्षे ते न चुकता पर्जन्यमानाची नोंद ठेवत आहेत.
कावळेसाद पॉईंट पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली जवळील गेळे गावात कावळेसाद पॉईंट या ठिकाणचा उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. कावळेसाद हे एक पठार असून पठारावरून वाहत आलेले पाणी जेव्हा कावळेसादच्या दरीमध्ये कोसळतं, तेव्हा ते पाणी दरीतून येणाऱ्या जोराच्या वाऱ्यासोबत पुन्हा वर येतं. हे अनोखं चित्र पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दीच गर्दी होताना दिसत आहे. उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्याचं पर्यटकांना नेहमी आकर्षण असतं.
महत्त्वाच्या बातम्या: