सिंधुदुर्ग  : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस दल आता स्मार्ट ठरलेय. सिंधुदुर्गात लवकरच टुरिझम पोलीस तयार करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे आयएसओ मानांकन प्राप्त झाली आहेत. त्यामुळे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे गौरवोद्गार गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काढले. सिंधुदुर्ग येथे आयोजित आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात ते बोलत होते. केसरकर यांच्याहस्ते या प्रमानपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक निमित गोयल, समीर रुपगल आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून येत्या वर्षभरात संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे. पोलीस हा गुन्हेगारांना धाक आणि सर्वसामान्य जनतेला आधार वाटला पाहीजे अशी कार्यपद्धती निर्माण करा, असा सल्ला केसरकर यांनी उपस्थित पोलीस वर्गाला दिला आहे.

दरम्यान जिल्ह्यात टुरिझम पोलीस तयार करण्याची घोषणा केसरकर यांनी यावेळी केली. पर्यटन जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी मोठे आव्हान असून हे आव्हान जिल्हा पोलीस समर्थपणे पेलतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. गावा-गावातील पोलीस पाटलांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे डोळे बनून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.