मनमाड : कुत्ता गोलीच्या नशेत मालेगावची तरुणाई धुंद झाली आहे. अवघ्या दोन रुपयांत मिळणारी ही नशा क्षणात शरीरात भिनते. त्यामुळे 'कुत्ता गोली' या नावाची सध्या मालेगावमध्ये जोरदार चर्चा आहे.
अठरा ते वीस वर्ष वयोगटातील बहुतांश तरुणाई या नशेच्या आहारी गेली आहे. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीही गोळीचं सेवन करुन गुन्हा करताना आढळले आहेत. मालेगाव शहर हे यंत्रमागाचं शहर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आणि कामगार राहतात. अगदी कमी पैशात जास्तीची नशा होईल असा फंडा मालेगाव शहरात रुजला.
नजीम मोहम्मद ऊर्फ भवानी.. एकदा मित्रांसोबत त्याने कुत्ता गोळीची नशा केली. मात्र कधी तो व्यसनाधीन झाला त्याला कळलंच नाही. पण व्यसनाच्या अंधारमय जगातून त्याला स्थानिक पोलिसांनी सुरु केलेल्या सल्ला केंद्राने बाहेर काढलं.
काय आहे कुत्ता गोली?
या गोळीचं नाव अल्प्रलोजोम आहे. काही उत्तेजक पदार्थांपासून गोळीची निर्मिती होते. गोळीच्या अतिसेवनाने शरीर बधीर होतं. याशिवाय मानसिक संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे.
मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या या गोळ्यांच्या सेवनाने नशेखोर व्यक्ती आपल्याच धुंदीत राहतो. त्यामुळे त्यांचं आयुष्य वाया जाण्याचा धोका निर्माण होतो. या गोळीत उत्तेजक पदार्थ असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीसाठी मनाई आहे. मात्र काही मेडिकल स्टोअर्स या गोळ्या सर्रासपणे विकतात.
गेल्या सहा महिन्यांपासून या गोळीची माहिती अनेकांना झाली आणि तिच्या विक्रीतही सहजासहजी उपलब्ध होऊ न शकणारी कुत्ता गोळी अनेक ठिकाणी छुप्या रितीने या गोळ्यांची पाकिटे मिळू लागल्यानंतर पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत या गोळ्या बाहेर विकणाऱ्यांवर कारवाई केली.
कारवाईत आतापर्यंत सहा हजार गोळ्या जप्त करुन दहा जणांवर काही दिवसांपूर्वी कारवाई केली. त्यात काही गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. तर 15 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत शहरात सर्च ऑपरेशन राबवून कुत्ता गोळी आणि नशेखोरांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यामुळे तरुणाईच्या प्रबोधनाबरोबरच मेडिकल्सवरही मोठ्या कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
दोन रुपयांच्या कुत्ता गोलीच्या नशेत मालेगावची तरुणाई धुंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Nov 2018 04:02 PM (IST)
मालेगाव शहर हे यंत्रमागाचं शहर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आणि कामगार राहतात. अगदी कमी पैशात जास्तीची नशा होईल असा फंडा मालेगाव शहरात रुजला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -