सिंधुदुर्ग : कुडाळ कविलकाटे येथील बावकारवाडी येथील दिपक मातोंडकर व त्यांचा मुलगा भगवान मातोंडकर यांचा डुकरं मारण्यासाठी लावलेल्या विजेच्या फासकीत शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


दिपक मातोंडकर व त्यांचा मुलगा भगवान मातोंडकर यांच्या सोबत असलेला आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याने त्याला कुडाळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. 


शेतातील नाचणीला पाणी लावण्यासाठी गेले असता डुक्कर मारण्यासाठी लावलेल्या विजेच्या फासकीत शॉक लागून मातोंडकर पिता, पुत्राचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी कुडाळ पोलीस पंचनाम्यासाठी दाखल झाले आहेत. या पिता पुत्राच्या मृत्यूची कुडाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे तर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


कविलकाटे बाव मळा येथील खुटवळ या परिसरात डुक्करांच्या शिकारीसाठी 11 केव्ही विद्युत वाहिनीवर आकडा टाकून शेताच विजेचा फासका टाकण्यात आला होता. हा फासका 300 मीटर अंतरावर पसरलेला होता. या फासक्याच्या तारेला चिकटून दीपक मातोंडकर व त्यांचा मुलगा भगवान मातोंडकर यांचा जागीच मृत्यू झाले. शेतातली  ही तार डुक्करांच्या शिकारीसाठी याच बाप लेकाने पसरल्या होत्या. 


डुकरांच्या शिकारीसाठी पसरलेल्या तारांमध्ये स्वतः ते अडकून मृत्युमुखी पडले. पहाटेच्या वेळेला एखादी शिकार या तारांना अडकून शॉक लागून पडली असेल हे पाहण्यासाठी ते या शेतात दोघेजण गेले होते. पहाटेच्या धुक्यामध्ये त्यांनी पसरलेल्या तारा त्यांच्या लक्षात आल्या नाहीत आणि या तारांना चिकटून हे दोघेही बाप लेक जागीच मृत्युमुखी पडले. कुडाळ पोलीस अधिक तपास करत आहेत.


महत्वाच्या बातम्या :