सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर लक्षवेधी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने आतापासूनच रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या असून चाचपणी केली जात आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने आता उमेदवारांच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.


सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात अलीकडील दोन वर्षांत मोठे फेरबदल झाले आहेत. याचे राजकीय पटलाबरोबरच सहकारातही पडसाद उमटल्याचे चित्र आहेत. नेत्यांच्या पक्ष बदलामुळे अनेक निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरत आहेत. जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न आहेत. खरंतर जिल्ह्याच्या राजकारणातील मोठं नेतृत्व म्हणून ओळख असलेले नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना जिल्हा बँक त्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणली होती. 


तत्कालीन स्थितीत राणे यांचे सहकारी म्हणून सतीश सावंत यांच्याकडे बँकेची धुरा सोपवली होती. मात्र अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय चित्र पालटले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार नितेश राणे भाजपवासी झाल्यानंतर सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करत त्यांच्या विरोधातच शड्डू ठोकला. यातून राजकीय कलहाची ठिणगी पडली. आमदार नितेश राणे यांच्या विजयानंतर भाजपकडून जिल्हा बँकेतील सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न झाला. त्यादृष्टीने चाचपणीही झाली. मात्र त्याला अपेक्षित यश आले नाही. 


सद्यस्थितीत सतीश सावंत शिवसेनेत आहेत. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ लाभली आणि बँकेतील त्यांची जागा अधिकच बळकट झाली. आता तर भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी भक्कम ठेवून भाजपला हादरा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी आतापासूनच व्यूहरचनेला सुरूवात झाली आहे. यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यावर सध्या भर आहे.