सिंधुदुर्ग: बाळासाहेब होते तेव्हा कोणाची हिमंत झाली नाही 'मातोश्री'ला आव्हान देण्याची. मात्र आता कोणी ऐरा-गैरा येतो आणि टपली मारून जातो. म्हणूनचं मी मॅवमॅव आवाज काढला असं आमदार नितेश राणे म्हणाले. त्यांनी शिवसेना, संजय राऊत आणि अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली. 


आमदार नितेश राणे म्हणाले की, " बाळासाहेब होते तेव्हा कोणाची हिमंत झाली नाही 'मातोश्री'ला आव्हान देण्याची. मात्र आता कोणी ऐरा-गैरा येतो आणि टपली मारून जातो. म्हणूनचं मी मॅवमॅव आवाज काढला. तो का काढला हे आता महाराष्ट्राच्या जनतेला दिसतय. एक अपक्ष आमदार आणि एक खासदार मातोश्रीवर जाण्याचं आव्हान देतायत आणि ते हनुमान चालिसा म्हणणार. हीच तर शिवसेनेची लायकी राहीली आहे. हीच आताच्या 'मातोश्री'ची ताकद राहिली. एकेकाळी बाळासाहेब 'मातोश्री'त बसून पूर्ण देशाला आव्हान द्यायचे. तेव्हा त्यांच्या नजरेला नजर देण्याची कोणाची हिमंत झाली नाही. आज कोणीही उठतो काहीही बोलतो."


नितेश राणे पुढे म्हणाले की, संजय राऊत, "अमोल मिटकरी यांच्यासारख्या बाजारू लोकांवर आम्ही बोलायला लागलो, आमचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा वेळ खराब करायला लागलो तर आम्हाला दुसरं कामच राहणार नाही ना. हे बाजारू लोक आहेत, आमच्या कणकवलीच्या बाजारात अशी लोकं विकत भेटतात. त्यामुळे अशा लोकांवर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही."


अमोल मिटकरी यांच्यावर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, यांना पैसे दिले की ते पाहिजे ते बोलतात. अमोल मिटकरी, संजय राऊत हे भाडेतत्त्वावर बोलणारे खासदार, आमदार लोकप्रतिनिधी आहेत. सांगलीच्या सभेत जेव्हा अमोल मिटकरी बोलत होते, तेव्हा त्यांची जी भूमिका होती ती राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका होती. कारण अमोल मिटकरी भाषण करत होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे हे व्यासपीठावरून दाद देत होते. त्यामुळे अमोल मिटकरीचा मानधनाचा चेक कोणी फाडला ते बघितले पाहिजे. अमोल मिटकरी वक्ते राहिले नाही तर ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत आमदार आहे. म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ही भूमिका आहे हे सरळ आहे. नुसता अमोल मिटकरींचा हा विषय नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ब्राह्मणांच्या विरोधात घेतेलेली ही भूमिका आहे. अमोल मिटकरी, संजय राऊत पैसे दिल्याशिवाय बोलत नाही. 


सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना पालकमंत्रीपद झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आमदार नितेश राणे म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला दहा पालकमंत्री आहेत, जशी रावणाला दहा तोंड असतात तशी असाही टोला त्यांनी लगावला आहे.