मुंबई : काही दिवसांपूर्वी गृहखात्यात मागच्या दाराने प्रवेश मिळालेल्या सचिन वाझेची प्रकरणे आणि त्याचे वसुलीचे पराक्रम सगळ्या देशाने पाहिले. अशाच प्रकारचा आणखी एक सचिन वाझे ऊर्जा विभागात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. जर महावितरण विभागातील वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या बंगल्यावर भव्य मोर्चा घेऊन जाणार असल्याचा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणी वरळी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे
याबाबत अधिक माहिती देताना हेमंत संभूस म्हणाले की, संजय ताकसांडे या महावितरण विभागातील बड्या अधिकाऱ्यानं पुणे येथे कार्यरत असताना 100 कोटी रुपयांपेक्षा देखील जास्त रकमेचा भ्रष्ट्राचार केला आहे. तसेच या अधिकाऱ्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील नोंद आहेत. मात्र तरीदेखील हा अधिकारी सध्या वसई येथे महावितरण विभागाच्या संचालक पदावर कार्यरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे महावितरण विभागाने खात्यांतर्गत केलेल्या चौकशीमध्ये या अधिकाऱ्यावर असलेले आरोप सिद्ध झाल्यामुळे त्याला बडतर्फ देखील करण्यात आलं होतं. तरीदेखील 17 मार्च 2021 रोजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या अधिकाऱ्याला पुन्हा कामावर घेतलं आहे. या अधिकाऱ्यावर महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान करणं, कंपनीच्या नियमांचा भंग करणे, कंपनीची जनमानसात प्रतिमा मलिन करणं यासह 7 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. ज्यावेळी ताकसांडे पुणे येथील पर्वती विभागात कार्यरत होते त्यावेळी शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचं भ्रष्टाचाराचं एक प्रकरण समोर आलं होतं. त्या प्रकरणात ताकसांडे यांनी दोषी अधिकाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करून त्यांना अभय देण्याचा प्रयत्न केला होता. ताकसांडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे असताना देखील महाराष्ट्राचे तत्कालीन ऊर्जासचिव अरविंद सिंग तसेच महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी या अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नव्हती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सध्याचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आणि महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी संजय ताकसांडेवर कुठलीच कारवाई केली नाही.
धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाची चौकशी करावी असे आदेश पंतप्रधान व राज्यपाल कार्यालयाकडून देण्यात आले होते. तरीदेखील कारवाई करण्यात आली नाही. एकंदरीतच हा संपूर्ण प्रकार सचिन वाझे प्रमाणेच संजय ताकसांडे यांना मागच्या दाराने एन्ट्री देऊन मोठ्या प्रमाणात वसुली करण्याचा प्रकार आहे त्यामुळे ऊर्जा मंत्र्यांनी तत्काळ या अधिकार्यावर कारवाई करावी किंवा या अधिकाऱ्याला निलंबित करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या बंगल्यावर मोर्चा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही.
या संपूर्ण प्रकरणी वरळी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या विषयावर आम्ही संबंधित अधिकारी आणि उर्जा मंत्रीलयाशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु अद्याप कोणती ही प्रतिक्रिया मिळू नाही शकली