सिंधुदुर्ग : कोरोनामुळे 2020 पासून शाळा बंद आल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. पर्यायी मार्ग म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आलं असलं तरी ज्या प्रमाणात शहरी भागात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुरक ठरतो, त्या तुलनेत यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परवड होत आहे. कोरोनामुळे शाळा, कॉलेज ऑनलाईन सुरू करण्यात आले आहेत. मात्र, ऑनलाईन क्लास अटेंट करता ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची परवड होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरे गावातील मुलं ऑनलाईन अभ्यासासाठी गावापासून ३ किलोमीटर लांब डोंगरमाथ्यावर चालत जात नेटवर्क शोधून ऑनलाईन क्लास अटेंट करत आहेत. कोंडुरे गावात कुठंही नेटवर्क नाही. त्यामुळे गावातील मुलांना ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी पायपीट करून डोंगरमाथ्यावर जावं लागतं.
जेव्हा नेटवर्क अभावी हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणासाठी रानावनात, डोंगरमाथ्यावर जातात तेव्हा जंगली श्रापदांपासून जीव मुठीत धरून अभ्यास करावा लागतो. कोकणात जंगलात सरास गावरेडा, बिबट्या, सरपटणारे पाणी असतात. त्यामुळे त्यांच्यापासून आपल्या मुलांना धोका असल्याची भीती पालकांना असते. मात्र, शिक्षणासाठी त्यांना त्याठिकाणी पाठवाव लागतं. शासनाने गावातच इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिल्यास या मुलांची होणारी परवड थांबणार आहे.
डोंगरमाथ्यावर मुलं ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी जातात. मात्र, मुलं डोंगरमाथ्यावर गेल्यावर पालकांना चिंता लागते. कारण या डोंगरमाथ्यावर बिबट्या, गवे, रेडे, साप असे प्राणी डोंगरात असतात. त्यामुळे आपल्या मुलांना काही इजा होऊ नये यासाठी पालकांना चिंता लागलेली असते. अलीकडेच बाजूच्या मळेवाड गावात शेतविहिरीत बिबट्या आढळला होता. त्यामुळे मुलांना शिक्षण महत्त्वाचे आहे. पण, त्यापेक्षाही त्यांच्या जीवाची पर्वा पालकांना आहे. त्यामुळे शासनाने गावातच नेटवर्क उपलब्ध करून मुलांना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मुलांसह पालकांची मागणी आहे.
मुळात कोकणची भौगोलिक परिस्थिती डोंगर दऱ्याची असल्याने ग्रामीण भागात आजही मोबाईलला नेटवर्क नसल्याने विद्यार्थी, आजारी पेशंट यांची परवड होते. कुठेतरी एखादा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांला सगळीकडून मदत केली जाते. इंटरनेट उपलब्ध करून दिले जाते. मात्र, ज्या गावात साधं मोबाईला नेटवर्क सुध्दा नाही अश्या ठिकाणी मुलांना ऑनलाईन अभ्यासासाठी नेटवर्कसाठी रानावनात फिरावं लागतय. सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरे, तळवणे, आरोस या गावात नेटवर्क नसल्याने मुलांची परवड होत आहे. एखादा आजारी रुग्ण असला तर डॉक्टर किंवा रुग्णवाहिका बोलवण्यासाठी एक ते दीड किलोमीटर जाऊन फोन लावावा लागतो. त्यामुळे एकीकडे जग 5 जी कडे जात असताना ग्रामीण भागात आजही मोबाईल नेटवर्क पोहोचलेलं नाही.