गडचिरोली : गडचिरोलीमधील मार्शल आर्ट खेळाडू एंजल देवकुळे या अवघ्या 10 वर्षांच्या मुलीची बाल गटात देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते 24 जानेवारी रोजी तिला सन्मानीत करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभाग दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार देतं. एंजलच्या या कामगिरीने गडचिरोली जिल्ह्यात आनंद व्यक्त होत आहे.

एंजलने सिकाई मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात देशासाठी अनेक सुवर्ण पदक पटकावली आहेत. याच कामगिरीची दखल घेत महिला आणि बालकल्याण विभागाने तिला हा पुरस्कार जाहीर केला आहे.

एंजल देवकुळे गडचिरोलीतील स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेत इयत्ता पाचवीत शिकत आहे. अवघ्या 10 वर्षाच्या वयात तिने आतापर्यंत तब्बल 40 सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. अत्यंत कमी वयात एंजलने परिश्रम आणि प्रशिक्षकांचं मार्गदर्शन या बळावर हे यश मिळवलं असल्याचं तिचे पालक सांगतात. तिच्या राष्ट्रीय पुरस्काराविषयी पालकांनी समाधान व्यक्त केलंय.

एंजलला आजवर सिकाई मार्शल आर्ट क्रीडा प्रकारातील नैपुण्यासाठी देश विदेशातही गौरवण्यात आले आहे. जगातील सर्वात कमी वयाची मार्शल आर्ट खेळाडू म्हणून ती प्रचलित आहे. आशिया अवॉर्डसह जिल्हा गौरव पुरस्कार, असे सन्मानही तिने मिळवले आहेत.

एंजल देवकुळेने फारशा प्रसिद्ध नसलेल्या क्रीडा प्रकारात आपले कौशल्य सिद्ध केल्याने तिची निवड राष्ट्रीय सन्मानासाठी झाली आहे. 24 जानेवारी रोजी देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा होणारा गौरव जिल्ह्याच्या आणि देवकुले कुटुंबीयांच्या यशात मानाचा तुरा ठरणार आहे.