कोल्हापूर : राज्यभर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढ होत असल्यामुळे प्रथम लक्षण असणाऱ्या रुग्णांना शासनाने होम क्वॉरन्टाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना घरात कसं ठेवायचं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर राजर्षी शाहू महाराज यांच्या नगरीतील अर्थात कोल्हापुरातील एक तरुण उद्योजक समोर आला आहे. होम क्वॉरन्टाईनची सुविधा नसणाऱ्या रुग्णांसाठी 3 स्टार कॅटेगिरीमधील स्वतःचं हॉटेल खुलं केलं आहे.
कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क परिसरात हॉटेल कृष्णा इन आहे. 'स्वामी, श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई यांचे नातू सिद्धार्थ उदयसिह शिंदे यांनी हे हॉटेल 2013 साली कोल्हापुरात सुरु केलं. हॉटेलचा व्यवसाय अत्यंत कुशल पद्धतीने सिद्धार्थ चालवतात, मात्र वडील आणि आजोबा यांच्यापासूनच घरामध्ये समाजकार्य करण्याची परंपरा शिंदे कुटुंबीयांमध्ये आहे. हा वारसा सिद्धार्थ शिंदे पुढे चालवत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसंच या रुग्णांना होम क्वॉरन्टाईनमध्ये ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. अनेक रुग्णांना विविध कारणाने होम क्वॉरन्टाईनमध्ये ठेवणं शक्य नसतं. ही गरज ओळखून सिद्धार्थ शिंदे यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी आपलं थ्री स्टार कॅटेगिरीमधील कृष्णा इन हॉटेल तात्पुरतं बंद करुन, यामधील 28 रुम या कोरोनाग्रस्तांसाठी देण्याचे ठरवले. ही कल्पना त्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर मांडली. त्यानंतर सर्व प्रशासकीय परवानगी घेऊन सिद्धार्थ यांनी आपलं हॉटेल होम क्वॉरन्टाईनची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी खुलं केलं.
कोरोनाबाधित रुग्ण या हॉटेलमध्ये येणार असल्याचे कळताच, इथे काम करणारे अनेक जण नोकरी सोडण्याच्या तयारीला लागले. मात्र सिद्धार्थ यांनी त्यांची समजूत काढली आणि आपल्या हॉटेलमध्ये 28 खोल्या या रुग्णांसाठी दिल्या. ज्यांना घरातून डबा येणं शक्य आहे, त्यांना घरातून जेवणाचे डब्बे येतात. मात्र ज्यांना जेवणाचे डबे येत नाहीत त्यांच्यासाठी चहा, नाष्टा, जेवणासह रहाण्याची सोय सिद्धार्थ यांनी केली आहे. संपूर्ण जगावर आपत्कालीन परिस्थिती ओढवलेली आहे. अशा परिस्थितीत प्रशासन सर्वच गोष्टी करु शकत नाही. त्यामुळे त्यांना जागरुक नागरिकांनी मदत केलीच पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहता आपणही काहीतरी करावं असं या तरुण उद्योजकाला वाटलं आणि त्यांनी स्वतःचं 3 स्टार हॉटेल या रुग्णांच्या सेवेसाठी दिलं.
सिद्धार्थ यांनी कोल्हापुरात B.E.चे शिक्षण घेतले, तर UK मध्ये उच्चशिक्षण घेतलं आहे. शिक्षणानंतर नोकरीमध्ये मन रमलं नाही, म्हणून त्यांनी हॉटेल व्यवसायाबरोबरच 2006 पासून समाजप्रबोधनाचे काम कोल्हापुरातून सुरु केलं. पर्यावरण आणि प्रदूषण याविषयी ते शाळा-महाविद्यालयांमध्ये आणि खेडोपाडी जाऊन जनजागृतीही करत आहेत. घरामध्ये समाज प्रबोधनाचा वारसा असल्यामुळे सिद्धार्थ यांना कोरोनाबाधित रुग्णांसाठी काम करण्याचे बळ मिळालेलं आहे. आपलं हे काम खूप छोटं असून आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण समाजसेवा करत असून यामध्येच आपणाला समाधान असल्याचं सिद्धार्थ सांगतात. सिद्धार्थ शिंदे या तरुण उद्योजकाने घेतलेला निर्णय हा निश्चितच कौतुकास्पद आहे. समाजातील इतर घटकांनीही सिद्धार्थ यांच्या निर्णयाचं अनुकरण करुन, अशा आपत्कालीन परिस्थितीत आपले हात खुले करुन काम केलं तर कोरोनावर आपण निश्चितच मात करु यात शंका नाही.
संबंधित बातम्या :