सोलापूर : सोलापूरच्या शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेची आज भक्तीमय वातावरणात सांगता झाली. धार्मिक विधी पार पाडणाऱ्या मानकऱ्यांची भगवी वस्त्र विसर्जन केली गेली. त्यांना नव्या कपड्यांचा आहेर भेट देऊन यात्रा पार पडल्याची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मोठ्या उत्साहात सुरुवात झालेल्या या महायात्रेचा शेवटही गोड झाला. सिद्धरामेश्वरांच्या जयघोषात यात्रा महोत्सवाची सांगता झाली. ही केवळ देवाची यात्रा नाही, तर समाजाच्या सर्वांगीण उन्नतीची सामूहिक कृती आहे.
कसब्यातील देशमुखांच्या वाड्यात कृतज्ञता सोहळा पार पडला आणि सोलापूरच्या सिद्धरामेश्वर यात्रेचा शेवट गोड झाला. मानाच्या दुसऱ्या नंदीध्वजाचे मानकरी असलेल्या देशमुख वाड्यात यात्रेची सांगता झाली. कप्पडकळी या धर्मिक विधीने यात्रेची समाप्ती झाली. कप्पडकळी याचा अर्थ वस्त्र विसर्जन. धार्मिक विधी पार पाडणारे मानकरी यात्रा काळात भगवी वस्त्र परिधान करतात. त्यांना नवे कपडे भेट देऊन ऋण व्यक्त केले जातात. परंपरेने यात्रा समाप्तीचा मान देशमुखांना आहे.
दीप प्रज्वलन, तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम विधी यासह धार्मिक विधी पार पाडण्याचा मान हिरेहब्बू परिवाराला आहे. नंदीध्वज नगर प्रदक्षिणा करण्याची जबाबदारी सुद्धा तेच पार पाडतात. सहा दिवसांच्या यात्रा काळात हे मानकरी भगवी वस्त्र परिधान करून यात्रेतले विधी करतात. त्यापूर्वी महिनाभरापासून सात्विक आहार आणि सदाचार याचा अवलंब करतात. यात्रेतले षोडशोपचार विधिवत पूर्ण केल्याने त्यांचे ऋण मानले जातात. आज त्यांना आहेर देऊन कृतज्ञता व्यक्त करून यात्रा समाप्त होते.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून यात्रेची लगबग सुरु होते. नंदीध्वज पेलण्याचा सराव महिनाभर चालतो. 11 जानेवारीला यात्रेची भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. आठवड्याच्या धार्मिक सोहळ्यानंतर यात्रेचा शेवटही गोड झाला. हा आठवडा सिद्धेश्वर भक्तांसाठी अविस्मरणीय असतो.
बाराव्या शतकात होऊन गेलेल्या या महापुरुषाची समता, बंधुता आणि प्रेम भाव जोपासणारी ही यात्रा समाजमनाला अखंड प्रेरणा देत राहो, हिच प्रार्थना प्रत्येक जण सिद्धरामेश्वराच्या चरणी करत असतो.