सांगली: सांगली-साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’प्रमाणे आयुष्य जगलेले बापू बिरु वाटेगावकर यांचं निधन झालं. ते 96 वर्षांचे होते. इस्लामपुरातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


बापू बिरु वाटेगावकर अर्थात आप्पा यांचं वाळवा तालुक्यातील बोरगाव हे गाव. बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून ते परिचीत होते.

गेल्या काही वर्षांपासून त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता. जुलै 2017 मध्ये त्यांच्यावर मावळातील सोमटणे फाटा इथल्या पवना हॉस्पिटलमधे सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. इतकं वय झालं असताना सहसा शस्त्रक्रिया केली जात नाही. मात्र भारदस्त बांधा, बलदंड शरीर आणि दांडगी ताकद असल्याने, आप्पांच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती.

कृष्णाकाठी रक्तरंजीत इतिहास

काही दशकापूर्वी गावगुंडांची मुजोरी मोडून काढून, बापू बिरु वाटेगावकर यांनी सांगली परिसरात रक्तरंजीत इतिहास रचला. गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्यांची खांडोळी करुन, गरिबांना मदत करण्यासाठी बापूंनी कायदा हातात घेतला. अनेकांची त्यांनी हत्या केली.

अनेक वर्षे  पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र माळरानावर, ऊसाच्या शेतात, डोंगर दऱ्यात राहून बापूंनी अनेक दशकं पोलिसांना चकवा दिला.

गावातला नामांकित पैलवान म्हणून नावारुपास आलेला आप्पाचे हात कधी रक्ताने माखले हे त्यांचं त्यालाच कळलं नाही. आप्पा जवळपास 25 वर्षे भूमिगत असल्याचं सांगितलं जातं. एकेदिवशी त्यांना पोलिसांनी पकडलंच.

बापू बिरु वाटेगावकर यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा भोगून आल्यानंतर त्यांना समाजप्रबोधनाचं काम केलं.

त्यांनी गावोगावी जाऊन प्रबोधन केलं. बापू बिरुंचं प्रवचन ऐकण्यासाठी गावोगावी मोठी गर्दी होत असे.  गरिबांवर अन्याय करु नका, परस्त्रीवर वाईट नजर ठेवू नका, ही त्यांची प्रमुख शिकवण होती.