Siddharam Mhetre Viral Video : थकीत ऊस बिल मागायला गेलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत माजी गृह राज्यमंत्र्यांची मुजोरी पाहायला मिळाली. सिद्धराम म्हेत्रे यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ केली आहे. म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्याचे मागील वर्षांच्या थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ही बैठक बोलावली होती. 


थकीत ऊस बिलाची रक्कम मागायला आलेल्या शेतकऱ्यावर माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे भडकले. रागाच्या भरात त्यांनी एका शेतकऱ्याला शिवीसुद्धा हासडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मातोश्री साखर कारखान्याचा कारभार सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडे आहे. या कारखान्याला उस विकणाऱ्या शेतकऱ्यांचे मागील वर्षांचे ऊस बिल थकीत आहे. हेच थकीत बिल मिळावे म्हणून गेल्या 11 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. तब्बल अकरा दिवसांपासून आंदोलन सुरु असल्यामुळं चर्चा करण्यासाठी काही शेतकरी अक्कलकोट इथं म्हेत्रे यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी बोलत असताना म्हेत्रे यांना राग अनावर झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी शेतकऱ्याला शिवी दिली. 


काय आहे प्रकरण?


मातोश्री साखर कारखान्याचा कारभार माजी गृहमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडे आहे. या कारखन्याला उस विकणाऱ्या शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे ऊस बील थकीत आहे. हेच थकीत बील मिळावे म्हणून मागील 11 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. तब्बल अकरा दिवसापासून आंदोलन सुरु असल्यामुळे चर्चा करण्यासाठी काही शेतकरी काल (शनिवारी) अक्कलकोट येथे म्हेत्रे यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी बोलत असताना म्हेत्रे यांना राग अनावर झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी शेतकऱ्याला शिवी दिली. सध्या या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 


व्हायरल व्हिडीओमध्ये काय म्हणतायत सिद्धराम म्हेत्रे? 


"सगळे शांत बसा, मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलून कोणाला तरी पुढारपण करायचा असेल, तर आताच कारखान्याला आग लावतो. तितका मी कडू आहे. या कारखान्यावर माझं पोट भरत नाही. पाच वर्षे..." (असं बोलत असताना मध्येच एक शेतकरी ओरडल्यावर सिद्धराम म्हेत्रे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी शिवी दिली) दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. 


दरम्यान,  गेल्या अनेक दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील काही शेतकरी सोलापूर काँग्रेस कमिटी कार्यालयसमोर उपोषणाला बसले आहेत. यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. लखीमपूर घटनेत मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बंदचं आवाहन करणारी काँग्रेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे लक्ष देणार की नाही ? असा सवाल आंदोलक विचारत आहेत.