शेतकऱ्यांना यंदा एफआरपीची रक्कम एकरकमी देण्याची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय एफआरपीपेक्षा 175 रुपये अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे कारखानदारांनी मान्य केले आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनीही हा समझोता मान्य असल्याचं सांगितलं. मात्र पहिली उचल 3200 रुपये मिळावी, या मागणीवर आजही ठाम आहे, असं खासदार राजू शेट्टी म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊसदराबाबत आज बैठकींचं सत्र पार पडलं.
या बैठकीत वार्षिक ताळेबंदपूर्वी 70-30 फॉर्म्युल्यानुसार नफ्यातील रक्कम अॅडव्हान स्वरुपात देण्याचे कारखानदारांनी मान्य केले. तसेच एफआरपी व्यतिरिक्त 175 रुपये प्रतिटन देण्यास कारखाने तयार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीनंतर दिली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''एफआरपीपेक्षा जास्त रक्कम देण्यास सरकार योग्य ती परवानगी देईल. त्यामुळे 5 नोव्हेंबरपासून कारखाने सुरु करावेत. तसेच इतर जिल्ह्यातूनही 70-30 च्या फॉर्म्युल्यानुसारच प्रश्न सोडवावेत.''
तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी म्हणाले की,''ऊस उत्पादकांना अॅडव्हान्स मिळणार यावर समाधानी असलो, तरी ऊसाला 3200 रुपये पहिली उचल मिळावी यावर आजही ठाम आहोत.''
तूर्तास चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीला यश आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीच्या गाळप हंगामात ऊसाला देण्यात आलेला दर आणि बाजारपेठेतील साखरेचा भाव यातील तफावतीवरुन बैठकीत समाधानकारक चर्चा न झाल्याने, सकल ऊस उत्पादक शेतकरी संघटनेने बैठक अर्ध्यावरच सोडली.
बैठकीतील ठळक घडामोडी
- वार्षिक ताळेबंद पूर्वी 70-30 फॉर्म्युल्यानुसार नफ्यातील रक्कम अॅडव्हान स्वरूपात देण्याचा प्रस्ताव मान्य
- एफआरपी व्यतिरिक्त 175 रुपयांचा प्रतिटन बोनस
- एफआरपीपेक्षा जास्त रक्कम देण्यास सरकार परवानगी देणार
- स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसाला 3200 रुपये पहिली उचल मिळण्यावर ठाम
- 5 नोव्हेंबरपासून कारखाने सुरु करण्याचे चंद्रकांत आवाहन
- बैठकीतील निर्णय एकतर्फी आल्याचा आरोप करत, सकल ऊस उत्पादक शेतकरी संघटनेने बैठक अर्ध्यावरच सोडली