मुंबई : भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला जात असताना आता शिवसेना भाजपची हाक ऐकणार नाही, असं वक्तव्य उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केलं आहे. माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात देसाईंनी हे मोठं विधान केलंय. भाजपनं शिवसेनेला खोटं पाडण्याचा प्रतत्न केला नसता तर राज्यात चित्र वेगळं दिसलं असतं, असंही सुभाष देसाई म्हणाले आहेत.


एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी नाणार प्रकल्पाविषयीदेखील भाष्य केलं आहे. नाणार प्रकल्पामुळे विकास होईल, तसेच रोजगारही उपलब्ध होईल, तरी तुमचा या प्रकल्पाला विरोध का? या प्रश्नाला उत्तरं देताना सुभाष देसाई म्हणाले की, 'कोणताही उद्योग, रोजगार, प्रकल्प आणायचा असेल तर त्यावेळी स्थानिकांच्या भावनांचा विचार करायचा की नाही? आमचं म्हणजेच, शिवसेनेचं ठाम मत आहे की, स्थानिकांना हवं असेल तर त्याचं स्वागत करावं, स्थानिकांना नको असेल तर त्यांच्या ते माथी मारायचं नाही.'


समृद्धी महामार्ग पालघर, शहापूर येथून जाणार आहे, तेथील स्थानिक प्रचंड नाराज आहेत, एवढचं नाहीतर स्थानिकांनी विरोधही दर्शवला आहे. मग स्थानिकांचा विचार काही विशिष्ट प्रकल्पांमध्ये करायचा आणि काही प्रकल्पांमध्ये नाही, असं काही आहे का? यावर उत्तर देताना सुभाष देसाई म्हणाले की, 'असं अजिबातच नाही, समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई अशा जवळपास 800 किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील काही भागांतील लोकांचा विरोध होता. त्यांची समजूत काढल्यानंतर, त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्यांना जी भिती वाटत होती, ती भिती दूर केल्यावर तसेच त्यांच्या अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण होत आहेत, हे दिसल्यावर त्यांचा विरोध मावळला. आता समृद्धी महामार्गाचं काम धुमधडाक्यात सुरू आहे. एवढचं नाहीतर त्या महामार्गाच्या आजूबाजूला काही उद्योगिक क्षेत्र निर्माण करून रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध करून देण्याचाही विचार आहे. त्यामुळे आता तेथील स्थानिकांचा विरोध नाही.'


विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. आता या सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम एबीपी माझावर पाहू शकणार आहात.


संबंधित बातम्या : 


#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन LIVE : शहराच्या गरजेप्रमाणे बदल होणं आवश्यक : जितेंद्र आव्हाड


‘जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका’, वृक्षलागवडीवरुन मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा


#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | माझ्या हातात सरकारचा रिमोट नाही : शरद पवार


#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन : महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे चालणार, शरद पवार