शिवाजी महाराजांच्या विरोधात अक्षेपार्ह वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा छिंदमवर दाखल आहे. या दोन्ही गुन्ह्यात शुक्रवारी त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता. अखेर नाशिक कारागृहातून आज दुपारी त्याची सुटका करण्यात आली. मात्र त्यानंतर तो अज्ञातस्थळी गेल्या असल्याची माहिती समजते आहे.
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमने जनक्षोभ उसळल्यावर व्हिडिओ प्रसारित करुन जनतेची माफी मागितली होती. मात्र, आता छिंदमनं ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे. छिंदमनं मी निर्दोष असून राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं आपल्या जामीन अर्जात म्हटलं होतं. त्याचबरोबर, “मी घरातील एकमेव कर्ता पुरुष आहे. आई आजारी असून, दोन लहान मुले असल्यानं देखभालीसाठी जामीन मिळावा.” असंही म्हटलं होतं.
सरकारी वकिलांनी छिंदमच्या जामिनाला तीव्र आक्षेप घेतला होता. छिंदम बाहेर आल्यास तपासावर दबाव आणण्याची आणि पुरावा नष्ट करण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून जामीन मंजूर केला. त्यामुळे जेल प्रशासनाने त्याची सुटका केली.
काय आहे प्रकरण?
श्रीपाद छिंदमने एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका सुरु झाली. 16 फेब्रुवारीला श्रीपाद छिंदम याला पोलिसांनी अटक केली होती.
संबंधित बातम्या :