मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधीमंडळात कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणावर निवेदन दिले. गुन्हे, नुकसान भरपाई इत्यादी संदर्भात सविस्तर माहिती सादर केली. यावेळी मिलिंद एकबोटेंवरील कारवाईसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली, मात्र संभाजी भिडेंवर बोलणे टाळलं. धक्कादायक म्हणजे, विरोधकांनीही भिडेंबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला नाही. किंबहुना, चकार शब्द सुद्धा काढला नाही.


कोरेगाव भीमा प्रकरणी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंवर निवेदन कारणं किंवा वक्तव्य करणं टाळलं.

कोरेगाव भीमा हिंसाचारात 200 ते 300 लोकांनी धुडगूस घातल्याचा उल्लेख निवेदनात मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र, हे लोक कोण होते, कोणत्या संघटनेचे होते, याबाबत विरोधकांनी एकही प्रश्नही मुख्यमंत्र्यांना विचारला नाही.

याचवेळी, मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही, असा प्रश्न मात्र विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

“मिलिंद एकबोटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला, फरार झाल्यावर कोंबिंग ऑपरेशन केले. शिवाय, जिथे जिथे न्यायालयात जामिनासाठी एकबोटे गेले, सरकारने तिथे तिथे चांगले वकील नेमत विरोध केला. उलट आम्ही कोठडी मागून चौकशीची मागणी केली आहे.”, अशी मुख्यमंत्र्यांनी मिलिंद एकबोटेंबद्दल माहिती दिली.

एकंदरीत संभाजी भिडे गुरुजींबद्दल मात्र मुख्यमंत्र्यांसह विरोधकांची गुपचिळी पाहायला मिळाली.