योगायोग म्हणजे उदयनराजेंच्या विरोधात आता पुन्हा एक मिशीवालाच नेता दंड थोपटणार आहे. कारण सातारा लोकसभेच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्याविरोधात आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील असणार हे नक्की झालं आहे.
श्रीनिवास पाटलांच्या या उमेदवारीने एका वेगळ्याच प्रश्नाची चर्चा रंगू लागली आहे. उदयनराजे आणि त्यांच्या विरोधकांच्या मिशा यांचं नेमकं काय गणित आहे? राजेंविरोधात नेहमी मिशीवालेच उमेदवार का येतात? सर्वांना पडतो.
मिशी ही मुळातच मराठमोळ्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य आहे. कारण या मिशीवरुन अनेक मराठी म्हणीही आपल्याकडे वापरात आहेत. मिशीला ताव देणं, मिशीला तेल लावून, तूप म्हणून सांगणं वगैरे. चेहऱ्यावरचा तोरा कायम ठेवायचा असेल तर तालमीचा ठसका आणि मिशीला हिसका असायलाच हवा, आणि त्यात पुढारी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातला असेल तर मग त्याची बातच न्यारी.
सातारा नगरपालिकेत शिवेंद्रसिंह राजे हे उदयनराजेंचे विरोधक. ते राजेंचे भाऊ असले तरी स्थानिक राजकारणात एकमेकांचं पटत नाही. दाढी आणि तलवार कट मिशा हे शिवेंद्रराजेंच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य.
त्यानंतर नंबर येतो मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून ज्यांनी राजेंना आव्हान दिले त्या नरेंद्र पाटील यांचा. नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांच्या संघटनेचे नेते आहेत. डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावरच्या आकडी मिशा. खास सातारी म्हणता येईल असं त्यांचं व्यक्तिमत्व. लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंची कॉलर विरुद्ध पाटलांच्या पिळदार मिशा अशीच लढाई रंगली होती.
साताऱ्यात दोन्ही राजेंचं शक्तीप्रदर्शन
येत्या साताऱ्याच्या पोटनिवडणुकीतही उदयनराजेंसमोर एका पिळदार मिशीवाल्याचं आव्हान आहे. माजी सनदी अधिकारी, राष्ट्रवादीचे माजी खासदार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे उदयनराजेंविरोधात उभे ठाकले आहेत. एकाच शब्दात वर्णन करायचं झालं तर रांगडा गडी. अधिकारी, राज्यपाल म्हणून कितीही हायप्रोफाईल वातावरणात राहिले, देशाच्या कानाकोपऱ्यात गेले तरी पाटलांच्या व्यकिमत्वातला हा भारदस्त मराठमोळा रुबाब काही लपला नाही. त्यामुळे आत्तापर्यंत ज्या दोन मिशीवाल्यांना राजे घाबरत होते, त्यात आणखी एकाची भर पडणार असं दिसत आहे. कॉलर आणि मिशीच्या या लढाईत नेमकं कोण जिंकणार? याचं उत्तर 24 ऑक्टोबरला कळेलच.
सातारा लोकसभा पोटनिवडणूक आघाडीकडून श्रीनिवास पाटील निवडणूक लढवणार | ABP Majha