नागपूर : वाढदिवसाला महाराष्ट्राच्या आकाराच्या केकचे तुकडे कापणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी माफी मागितली आहे. हे कृत्य करायला नको होतं, असं म्हणत राज्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया अणेंनी दिली.
 


स्वत:च्या वाढदिवशी अणे यांनी नागपुरात महाराष्ट्राची चित्र असलेल्या केकमधून विदर्भ कापून वेगळा केला होता. त्यांच्या या कृत्यामुळे राज्यभरातून टीकेचे बाण निघाले होते. अणे यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी करावी, मात्र महाराष्ट्राचा केक कापून नागरिकांच्या भावना दुखावण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया विविध स्तरातून उमटली होती.

 
अणेंच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी अणे यांचा फोटो असलेला केक कापला होता, तर केकच्या माध्यमातून राज्याचे दोन तुकडे करणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात ठेवतील, असा धमकीवजा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. औरंगाबादमध्ये श्रीहरी अणेंचा केक कापून शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र अणेंनी दिलगिरी व्यक्त करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या विधानानंतर श्रीहरी अणे यांनी महाधिवक्ते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर यापुढे स्वतंत्र विदर्भासाठी लढत राहीन असा निर्धार त्यांनी केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यावर सातत्याने अन्याय झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा स्वतंत्र करा अशी भूमिका श्रीहरी अणेंनी घेतली. अणेंच्या भूमिकेमुळे दिल्लीत त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली होती. काँग्रेस नेते नितेश राणेंनी याची जबाबदारी स्वीकारली होती.

 

संबंधित बातम्या :


 

श्रीहरी अणेंकडून वाढदिवसाला स्वतंत्र विदर्भाचं केक कटिंग