पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना ‘विठ्ठल’ पावला आहे. मंदिर कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ देण्यात आलीय. शिवाय, दिवाळीसाठी बोनस म्हणून एका महिन्याचं वेतनही दिले जाणार आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यासंदर्भात निर्णय घेतला.
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पगारवाढीसाठी झगडत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अखेर विठ्ठल पावला असून समितीच्या बैठकीत घसघशीत वेतनवाढ जाहीर करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. मंदिर समितीची आजची बैठक खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांच्या घरी दिवाळी घेऊन येणारी ठरली आहे. यंदा प्रथमच कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून एका महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.
विठ्ठल मंदिरात अनेक वर्षांपासून हे गोरगरीब कर्मचारी अतिशय कमी वेतनावर काम करीत आले आहेत. मंदिरात एकूण 265 कर्मचारी असून यामध्ये 65 पेक्षा जास्त महिला कर्मचारी आहेत. मंदिराच्या सुरक्षेपासून, सफाई आणि मंदिराचे किचन सांभाळण्याचे काम या महिला कर्मचारी करीत असतात. घराचा खर्च भागवण्यासाठी या महिला कर्मचारी मंदिरातील काम करून घरात शिवणकामसारखे व्यवसाय करीत आहेत. तर पुरुष कर्मचारीही बाहेर पडेल ते काम करून घरखर्चाचे गणित जुळवत असतात. मात्र मंदिर समितीने आज कायम कर्मचाऱ्यांना 15 टक्के, हंगामी कर्मचाऱ्यांना 20 टक्के आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांना 25 टक्के पगारवाढ दिली आहे. आता या पगारवाढीमुळे या कर्मचाऱ्यांना घर खर्च भागवण्यास मदत होणार आहे.
मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी मंदिरातील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाचा आरोग्य विमा केल्याने आता या कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय खर्च देखील वाचणार आहे. एका बाजूला 35 वर्षानंतर 265 कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना अतुल भोसले यांनी कर्मचाऱ्यांना ही गोड भेट दिल्याने कर्मचाऱ्यांना विठ्ठलच पावल्याचा आनंद झाला आहे.