रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासाठी सुवर्ण संकल्प आज करण्यात आला. यासाठी किल्ले रायगड आज शिवभक्तांच्या गर्दीनं फुलून गेला होता. या सुवर्ण संकल्पासाठी जळपास 15 हजार शिवभक्त किल्ले रायगडावर जमले होते.


श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 32 मणांचं हे सुवर्ण सिंहासन लोकसहभागातून साकारणार असल्याचं, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे गुरुजी यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. त्यानुसार, या संकल्पासाठी आज देशभरातून 15 हजार शिवभक्त रायगडावर उपस्थित होते.

सकाळी 6 वाजल्यापासून शिवभक्तांनी होळीच्या माळावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या सिंहासनासाठी कोणतीही शासकीय मदत घेण्यात येणार नसून, देशभरातून सोनं आणि खात्यावर पैसे जमा करता येणार आहेत.

शिवाजी महाराजांच्या सोन्याच्या सिंहसनाचा इतिहास

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका वेळी महाराजांसाठी खास 32 मण वजनाचं सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं होतं. हे सिंहासन रायगड जिल्ह्यातील पोलादपुरचे रामजी दत्तो चित्रे यांनी घडवलं होतं. या सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणितनवरत्ने जड्वलेली होती. आज सिंहासनाचे वजन किलोमध्ये केल्यास 144 किलो होईल.

इतिहास कालिन नोंदीनुसार वजनाचे कोष्टक

  • 24तोळे : 1 शेर (जुना तोळा सध्याच्या ११.७५ ग्रॅमचा होता)

  • 16 शेर : 1 मण ( 1शेराचे वजन : 11.75 ग्रॅम x 24 तोळे = 282 ग्रॅम)

  • 1 मण : 282 ग्रॅम x 16 शेर = 4512 ग्रॅम (4.5 किलो)

  • 32 मण : 4512 x 32 = 144384 ग्रॅम (144 किलो)


संदर्भ : शिवचरित्र (बाबासाहेब पुरंदरे)

संबंधित बातम्या

रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन बसवणार!, संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प

...तर शिवरायांचं स्मारक 5 ते 6 महिन्यात उभं राहिलं असतं : भिडे गुरुजी