शुक्रवारी संपकरी शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर शेतकरी संपामध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या एका गटानं संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेत, सरकारकडून आंदोलन दाबण्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन करण्यात आलं.
यावेळी पुणतांबातील संपाच्या बाजूनं असलेले शेतकरी आणि बाहेर गावाहून आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपलं मुंडन करुन घेतलं. ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनावेळी सरकारच्याविरोधात जोरदार घेषणाबाजीही करण्यात आली.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस असून, या आंदोलनाची कास आता राजकीय पक्षांनी धरल्याचं दिसतं आहे. कारण आज राज्यातल्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसनं सक्रीय साथ दिल्याचं दिसलं.
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आठवडी बाजार बंद पाडला. यावेळी शेतमाल विक्रेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.
दुसरीकडे सत्तेतला वाटेकरी असलेल्या शिवसेनेच्या युवासेनेनं आज उस्मानाबादमध्ये चक्काजाम केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा सत्ता सोडा अशा आशयाच्या घोषणा खुद्द युवासैनिक देत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता राजकीय बळ मिळत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.
संबंधित बातम्या