माहितीनुसार नेहमी मुंबईला राहणारा व नुकताच गुजरातहून ट्रक घेऊन आलेल्या एकास होम क्वारंटाईन व्हावे, असे सांगितल्याने वाद झाला. या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्य़ात आलं आहे.
विद्यमान बरमदे हा नेहमी मुंबईला वास्तव्याला असतो. तो ट्रॅक घेऊन गुजरातहून आला अशी माहिती कळल्याने बोळेगावातील पुढाकार घेणारे शत्रुघ्न पाटील यांनी विद्यमान बरमदे यास होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला. त्यावरुन बरमदे आणि पाटील यांच्यात वाद झाला. दरम्यान बरमदे यांची बहीण शेजारील चांदोरी गावात राहते. या वादानंतर तो तिथे गेला. तिथून काही लोकांसह नंतर पहाटे परत तो बोळेगावात आला. त्यावेळी पुन्हा हाणामारी झाली, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी दिली आहे.
या घटनेत फिर्यादी शत्रुघ्न पाटील यांचे वडील शहाजी पाटील व त्यांचा पुतण्या वैभव पाटील यांचा मृत्यू झाला आहे. तर शत्रुघ्न पाटील गंभीर जखमी झाले, अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती कासारशिरशी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. लातूरहून अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने पोलिसांची सात पथक तयार करण्यात आली आणि यातील मुख्य आरोपी विद्यमान बरमदे याच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी दिली आहे.