मुंबई: मुंबईत अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी आज महाराष्ट्रभरातून माती आणि पाणी मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून माती आणि पाण्याचे 72 कलश शुक्रवारी मुंबईत दाखल होतील.

  • जळगावमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तापी, पूर्णा, गिरणा, पांझरा आणि बोरी नद्यांचं पाणी संकलित केलं.

  • तर संत मुक्ताई, चांगदेव, सखाराम महाराज आणि असीरगडमधली मातीही एकत्र केली.

  • कोल्हापुरातल्या पन्हाळा, विशाळगड, सामानगड, भुदरगड, रांगणा अशा किल्ल्यांवरची माती, आणि पंचगंगा, कृष्णेच्या संगमाचं जल संकलित करण्यात आलं.

  • नांदेडमधल्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरची माती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संकलित केली.

  • तर अहमदनगरमध्ये मुळा, प्रवरा आणि सीना नदीचं जल, तर प्रेमगिरी किल्ली, विश्रामगड, भुईकोट किल्ला, हरिश्चंद्रगड, रतनगड आणि खर्डा किल्ल्यातली माती संकलित करण्यात आली.


शिवस्मारकाचं भूमीपजून 24 डिसेंबरला असलं तरी 23 तारखेपासूनच म्हणजेच उद्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होत आहे.

कसा आहे मेगा प्लॅन

23 तारखेला राज्यातून आलेली माती आणि पाणी यांचा कलश फ्लोटवर ठेवण्यात येईल. या फ्लोटसोबत सकाळी चेंबूरमधील शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून शोभायात्रेची सुरुवात होणार आहे.

फ्लोट आणि शोभायात्रा सायन, लालबाग, गिरगाव चौपाटी असा प्रवास करत गेट वे ऑफ इंडियाला पोहोचणार. त्यानंतर गेट वे ऑफ इंडियावर उभारलेल्या भव्य स्टेजवर हा कलश, माती आणि पाणी सोपवलं जाईल. हेच पाणी आणि माती मुख्यमंत्री 24 डिसेंबरला पंतप्रधानांना देणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमीपूजन होणार आहे.

शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी शिवकालीन वातावरण निर्मिती करण्यासाठी सरकारने नितीन देसाईंकडून मेघडंबरी किल्ल्याचा देखावा साकारला आहे.

दरम्यान भव्य रॅली आणि कार्यक्रम मुंबईत असले तरी संपूर्ण महाराष्ट्र यानिमित्ताने शिवमय होणार आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे फ्लेक्स वाटप चालू असून अनेक ठिकाणी हे फ्लेक्स झळकणार आहेत.

अरबी समुद्रात भूमीपूजनासाठी फक्त हे सहा जण उतरणार!

अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फक्त सहा जण जाणार आहेत. भूमीपूजन आणि जलपूजनाला समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती जाणार आहेत.

कसं असेल समुद्रातील शिवस्मारक?

अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या भल्यामोठ्या खडकावर शिवस्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या आहेत.

शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी, यादृष्टीने भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्यात येणार आहे.

त्या दृष्टीने सरकारच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. सरकारने विनायक मेटेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

16 एकर जमीन

शिवस्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ अरबी समुद्रात 16 एकर जमीन निवडली आहे. हे स्मारक सुमारे 309 फूट उंच असेल. समुद्रात तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार आहे. त्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांबाबतची माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफीत दाखविण्यासाठी दालन, वस्तुसंग्रहालय आणि उद्यान असा आराखडा आहे.

स्मारकाची जागा राजभवनपासून दक्षिण-पश्चिम बाजूस 1.2 कि.मी अंतरावर, गिरगाव चौपाटीवरील एच.टु. ओ जेट्टीपासून दक्षिण-पश्चिम दिशेने 3.60 कि.मी अंतरावर आणि नरिमन पाँईटपासून पश्चिमेस 2.60 कि.मी अंतरावर आहे.

स्मारकासाठी 15.96 हेक्टर आकारमानाचा खडक निवडण्यात आला आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे 650 मी द325 मी. एवढे आहे. सभोवताली 17.67 हेक्टर जागा उथळ खडकाची आहे.

काम दोन टप्प्यात

शिवस्मारकाचं काम दोन टप्प्यात केलं जाणार आहे. पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती यापूर्वी विनायक मेटेंनी दिली होती. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांच्या पुळ्याचा समावेश असेल. तर दुसऱ्या टप्प्यात आर्ट गॅलरी, म्युझियम, गड-किल्ल्यांचा देखावा, शिवचरित्र अशा अनेक गोष्टींचा समावेश असेल.



संबंधित बातम्या

VIDEO : असं असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक!

शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला अरबी समुद्रात फक्त हे सहा जण उतरणार!

शिवस्मारकाच्या भूमीपूजनापूर्वी 23 डिसेंबरला भव्य शोभायात्रा

शिवरायांचा पुतळा बनवायला मिळणं भाग्य समजतो : राम सुतार

शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी भाजपचा गाजावाजा

मोदींच्या हस्ते 24 डिसेंबरला शिवस्मारकाचं भूमिपूजन