Babasaheb Purandare : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी चरित्राचा प्रवास कसा सुरु झाला? याबाबत उलगडा केला होता. यावेळी त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला होता.


100 वर्षांचा झालोय, मात्र मी काही वेगळं केलेलं नाही. या आयुष्यात कसंलही व्यसन केलं नाही, कुठलंही औषध गोळ्या घेतल्या नाहीत. एकच व्यसन होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं, असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी माझा कट्टावर सांगितलं होतं. शिवचरित्राचं काम हाती घेतल्यानंतर एकदा जो मी शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याला चिकटलो ते चिकटलोच. मग माघार घेतली नाही. आजही मी डोंगर चढतोच आहे, असं मला वाटत, असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.  


माझा कट्ट्यावर बोलताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला होता.  सोबतच शिवचरित्राचा प्रवास देखील उलगडवून सांगितला. लहानपणी आपण देखील काही करामतींमुळं मोठ्या लोकांचा मार खाल्ला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आम्ही पावनेदोनशे तरुण पोरांनी पोर्तुगीजांवर हल्ला केला होता. परीक्षेला बसताना जसं वातावरण होतं तसं त्यावेळची स्थिती होती. त्यावेळी पाऊस सुरु होता, त्यावेळी आम्ही नदी नाले पार करत त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो होतो, असं त्यांनी सांगितलं.  


मराठी संस्कृती, मराठी परंपरेवर केलेल्या अभ्यासावर बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की, हे मला सहज मिळालं. माझ्या घरातूनच मला हे संस्कार मिळाले. माझे आईवडील, माझे भाऊ यांच्याकडून हे संस्कार मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर हा शब्दांमधून नाही तर कृतीमधून दिसावा, असं बाबासाहेब पुरंदरे म्हणाले होते.


बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा -
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले.  'जाणता राजा' या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. 'सावित्री', 'जाळत्या ठिणग्या', 'मुजऱ्याचे मानकरी', 'राजा शिवछत्रपती', 'महाराज', 'शेलारखिंड', 'पुरंदऱ्यांचा सरकारवाडा', 'शनवारवाड्यातील शमादान', 'शिलंगणाचं सोनं', 'पुरंदरच्या बुरुजावरून', 'कलावंतिणीचा सज्जा', 'महाराजांची राजचिन्हे', 'पुरंदऱ्यांची नौबत' आदी साहित्य प्रकाशित झाले आहे.  राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.