Shivshahir Babasaheb Purandare passed away : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी शोक व्यक्त केला. शरद पवार यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास साध्या भाषेत सांगणारे, शेकडो व्याख्यान देणारे बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत. ते दीर्घायुषी होते, त्यांनी वयाची 100 पूर्ण केली. कायम लोकांच्या संपर्कात होते. अस्वस्थता, दुःख अनेकांच्या मनात आहे. त्यांनी शिवछत्रपतींचा इतिहास ठेवला. त्यात काही वादग्रस्त मुद्दे होते. त्यावर बोलायला मी जाणकार नाही. इतिहासाच्या संदर्भात आस्था निर्माण करण्याचे मोठे कार्य बाबासाहेबांनी केले आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पवार यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या नव्या पिढीला पूर्वजांचा इतिहास अत्यंत साध्या भाषेत सांगत इतिहासासंदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेकडो व्याख्याने त्यांनी दिली. या विषयासंबंधी नव्या पिढीमध्ये आस्था निर्माण करण्यासाठी योगदान देणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यामध्ये नाहीत.
पद्मविभूषण बाबासाहेबांच्या निधनानं एक अध्याय पडद्याआड- उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ते 100 वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.