नागूपर : ''खंडणीखोर गुंडांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा, कुख्यात गुंडाला गडकरी वाड्याचा आशीर्वाद आणि नागपुरात सत्तेच्या मोहाने गुंडांचा भागवत'', असे एक ना अनेक तिक्ष्ण शाब्दिक बाण सोडणारी शिवसेनेची व्हिडिओ क्लिप नागपुरात भाजप नेत्यांना लालबुंद करत आहे.


नागपुरातील विशिष्ट प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारांनी एक व्हिडियो क्लिप प्रचारात आणली आहे. मुंबईतून नागपूरला शिकायला चाललेल्या एका युवती आणि तिच्या पालकांच्या मनातील भावना या व्हिडिओ क्लिपमधून मांडण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंडांना कसा पाठिंबा देतात, गडकरी वाड्याचा गुंडांवर कसा हात आहे, हे पटवून देण्याचं काम शिवसेनेने या व्हिडिओ क्लिमधून केलं आहे. खासकरून महिला मतदारांना नागपूरच्या कायदा व सुव्यवस्थेची अवस्था समजावून सांगितली जात आहे.

शिवसेनेच्या व्हिडिओ क्लिपमध्ये नागपूरची अतिरंजित स्थिती दाखवल्याचा भाजपचा आरोप आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नावं वापरून आणि संघ प्रमुखांचं नाव वापरून शिवसेनेने मर्यादा ओलांडल्याचा आरोप भाजपने केलाय.

विशेष म्हणजे नागपुरात यंदा भाजपने काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना उमेदवारी नाकारली आहे. मात्र अशा उमेदवारांना शिवसेनेने भगवा हातात सोपवत संधी दिली आहे.

भाजपने नाकारलेल्या अनिल धावडे या गुन्हेगार पार्श्वभूमीच्या नेत्याला शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यामुळे धावडेसारखे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार शिवसेनेला कसे चालतात, असा सवाल भाजपने केला आहे.

राजकारणातील गुंड या विषयावरून सर्वत्र 'महाभारत' सुरु आहे. सर्वच पक्ष दुसऱ्या पक्षावर गुंडाला आश्रय दिल्याचा, त्याची मदत घेतल्याचा आरोप करत आहेत. शिवसेनेने तर भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात याच मुद्द्यावर घेरलं आहे. मात्र शिवसेनेची ही प्रचाराची व्हिडिओ क्लिप दोन्ही मित्र पक्षांमधल्या संघर्षाचा मुद्दा बनली आहे.