मुंबई : रिझर्व्ह बँकेने सहकारी बँका बंद करण्याचा घाट घातला आहे. सरकारने सहकारी बँकांसंबंधी दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा कर्मचारी संपावर जातील, असा इशारा शिवसेना खासदार आणि सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे.

गोर गरिब जनता राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते उघडू शकत नाही. त्यासाठी सरकारने त्यांना कुठली पर्यायी व्यवस्थादेखील उपलब्ध करुन दिलेली नाही. वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा देखील अडसूळ यांनी दिला आहे.

सरकारमधून बाहेर पडण्याचा आनंदराव अडसूळ यांचा इशारा सूचक राजकीय विधान मानलं जात आहे. कारण अडसूळ हे लोकसभेत शिवसेना गटनेते देखील आहेत. त्यामुळे सरकार सहकारी बँकांसंबंधी काही भूमिका घेणार का, याकडे लक्ष लागलं आहे.

सहकारी बँकांचे बहुतांश अध्यक्ष हे राजकीय नेते आहेत. काळ्या पैशाचा पांढरा पैसा करण्यासाठी सहकारी बँकांचा वापर होऊ शकतो, त्यामुळे आरबीआयने सहकारी बँकांमध्ये नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बंदी घातली आहे.