पंढरपूर : विठ्ठलाच्या गळ्यात हार घातल्याने पंढरपुरात मंदिरातल्या पुजाऱ्याकडून एका भाविकाला मारहाण करण्यात आली आहे. दत्तात्रय सुसे असं या भाविकाचं नाव असून या प्रकरणी पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.


सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय हे गाभाऱ्यात पोहोचले, तेव्हा हार घालताना पुजाऱ्यांनी त्यांना रोखलं, त्यामुळे झालेल्या वादानंतर पुजाऱ्याने कानशिलात मारल्याचा आरोप सुसे यांनी केला आहे.

भणगे असं पुजाऱ्याचं नाव असून गैरवर्तनासाठी यापूर्वीही मंदीर प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली असल्याची माहिती आहे. पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये भणगे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान भाविकांशी गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही. पुजाऱ्याची चौकशी करुन तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल, असं जिल्हाधिकारी आणि मंदीर समितीचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी सांगितलं.